शुभम गायकवाड
उदगाव :चिंचवाड (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या विविध कामावरुन सदस्य व सरपंच एकमेकांसमोर ठाकले आहेत. सरपंचांनी सुचविलेल्या कामांना सदस्यांचा विरोध तर सदस्यांच्या सूचनेला सरपंचांचा नकार अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. बिनविरोधची परंपरा असलेल्या चिंचवाड येथे काही कारणामुळे सरपंच निवडणूक लागली.
यामध्ये ज्योती काटकर या लोकनियुक्त सरपंच म्हणून निवडून आल्या. त्यांनी गेल्या दोन वर्षांत सर्वपक्षीय नेत्यांकडे साकडे घालून गावासाठी निधी आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. परंतु गावातील स्थानिक राजकारण व सरपंचांना सदस्यांचा असलेला विरोध यामुळे ग्रामपंचायतीचे राजकारण भलतेच पेटले आहे.
चिंचवाड येथे पाणीपुरवठा, आरोग्य, अंतर्गत रस्ते, शेतकऱ्यांचे प्रश्न असे महत्त्वाचे विषय असताना सरपंच, उपसरपंच व ग्रामविकास अधिकारी यांच्यात समन्वयाचा अभाव दिसत आहे. त्यामुळे गावात विकासकामांऐवजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायतीचे सदस्य व कर्मचारी वर्ग यांच्यातील राजकारणाचा फटका ग्रामस्थांना बसत आहे. तर ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार चालविण्यासाठी महसूल गोळा करणे महत्त्वाचे असताना त्यासाठी कोणी पुढे येताना दिसत नाही.
कोट -
पाणीपुरवठ्याच्या वीज कनेक्शन संदर्भात आलेली नोटीस कनेक्शन तोडणीपर्यंत मला दाखविण्यात आलेली नाही. वसुली संदर्भात कर्मचारी कोणतीही तत्परता दाखवत नाहीत. तर सरपंच राजीनाम्याचा कोणताही विषय आला नाही. त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्न येत नाही.
- ज्योती काटकर, सरपंच
कोट -
लोकनियुक्त सरपंच निवडीवेळी सर्वांना समान संधी मिळावी, असे नेत्यांचे धोरण ठरले होते. दुसऱ्या टर्मला बिनविरोध निवडणूक करताना अडचणी आल्या, परंतु आम्ही काटकर यांच्यामागे ठाम राहिलो. सरपंच म्हणून त्यांनी आपल्या अधिकारांचा वापर करावा व नेत्यांचा आदेश पाळावा.
- अजित चौगुले, सदस्य सुकाणू समिती