कोल्हापूर : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकाच्या स्पर्धेत सगळ्याच पक्षांतील कारभारी नगरसेवकांतील कुरघोडीचे राजकारण उफाळून आल्याचे दिसत आहे. महाडिक गटातील याच राजकारणाने सुनील मोदी यांचा पत्ता कापल्याचे स्पष्ट झाले. मोदी यांनी त्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. स्वीकृत नगरसेवक घेण्यात काँग्रेसकडून आमदार सतेज पाटील यांनी मोहन सालपे व तौफिक मुल्लाणी या नव्या कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांनी गेल्या सभागृहातही अशीच सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली होती; त्यामुळे काँग्रेसमध्ये त्यावरून नाराजी अथवा बेबनाव झाला नाही. उलट चांगल्या कार्यकर्त्याला संधी मिळाल्याची प्रतिक्रिया व्यक्त झाली. महापालिकेत काँग्रेसकडून मुस्लिम समाजातील पाच कार्यकर्त्यांना उमेदवारी दिली होती; परंतु त्यातील एकही निवडून आला नाही. अपक्ष निलोफर आजरेकर निवडून आल्यावर त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. त्यामुळे मुल्लाणी यांना संधी देऊन आमदार पाटील यांनी हादेखील समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. ‘स्वीकृत सदस्यांची निवड मी निकाल लागल्याच्या दुसऱ्याच दिवशी केली आहे,’ असे पाटील भेटायला गेलेल्या इच्छुकांना सांगत होते. तेच त्यांनी खरे करून दाखविले. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आर. के. पोवार की जयंत पाटील आणि भाजपमध्ये सुनील मोदी की किरण नकाते अशी जी रस्सीखेच झाली त्यामागे त्या-त्या गटातील कारभाऱ्यांतील वर्चस्वाचे राजकारण कारणीभूत आहे. पोवार व जयंत पाटील हे तसे दोघेही कारभारीच; परंतु पोवार मूळचे पक्षाचे कार्यकर्ते. त्यामुळे नेत्यांनीही कार्यकर्त्यांपेक्षा जास्त निष्ठावान असलेल्यास संधी दिली. प्रा. पाटील हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे. त्यामुळे आज-उद्या कोल्हापुरात असलेल्या शरद पवार यांनी आता कोल्हापूरची ‘राष्ट्रवादी’ जनसुराज्य शक्ती पक्षाला आंदणच देऊन टाकावी, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीतून उमटली. पवार यांना काही नाराज कार्यकर्ते भेटण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे. असेच राजकारण भाजप-ताराराणी आघाडीमध्येही घडले. या दोन पक्षांतून सुनील मोदी व सुनील कदम ‘स्वीकृत’साठी इच्छुक होते. त्यातील सुनील कदम यांची सरशी झाली व मोदी यांचा पत्ता कापला गेला. महाडिक गटात मोदी, कदम, सुहास लटोरे असे दुसऱ्या फळीतील बरेच कारभारी आहेत. मोदी महापालिकेत आले तर ते कदम यांनाही डाचणारे होते. त्यामुळे अण्णांनी ताकद लावून मोदी यांना ‘व्हीनस कॉर्नर’लाच रोखले. मोदी यांना संधी द्यावी, अशी विनंती आमदार महादेवराव महाडिक यांनीच थेट पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना केली होती; परंतु त्यांनीही महाडिक गटाच्याच किरण नकाते यांना संधी दिली. याचा अर्थ पालकमंत्र्यांनी महाडिक यांच्यापेक्षा कारभाऱ्यांनाच महत्त्व दिल्याचे दिसते. दुसरे महत्त्वाचे असे की, मोदी नकोत असे भाजपच्या संघटनेतील बहुतेकांचे म्हणणे होते. मोदी आले तर तेच सगळे ‘बळकावतील’ अशीही भीती त्यामागे होते. त्यामुळेही दादांना कारभाऱ्यापेक्षा कार्यकर्त्याला संधी देणे भाग पडले. मोदी यांनी केले आत्मचिंतन... ४स्वीकृत निवडीनंतर मोदी यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले. त्यामध्ये त्यांची नाराजी स्पष्ट दिसते; परंतु ती व्यक्त करून पुढे काय करणार हे सांगणे मात्र त्यांनी टाळले आहे. ४मोदी म्हणतात, ‘मला ही संधी मिळाली नाही याचा आघाडीबाहेरील काहींना निश्चितच आनंद झाला असेल. आघाडीतील काहींना आतून आनंद झाला असेल तर आघाडीतीलच इतर काहींना मोदी यांच्यावर कुरघोडी केल्याचे समाधान लाभले असेल. या सर्वांव्यतिरिक्त अनेक लोकांना या निर्णयाचे वाईटही वाटले आहे. ४माझ्या दृष्टीने आजचा दिवस कोणावर दोषारोप ठेवण्याचा नसून आत्मचिंतन करण्याचा आहे. ४या चिंतनातून भविष्यातील योग्य पारदर्शकता व स्थिरता येईल, असाच निर्णय घेण्याचा प्रयत्न आहे.
कुरघोडीचे राजकारण उफाळले
By admin | Published: January 17, 2016 12:25 AM