इचलकरंजी : शहराला शुद्ध पाणी मिळावे, यासाठी काळम्मावाडी पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असून, आमदार सुरेश हाळवणकर त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. शहराच्या पिण्याच्या पाण्यावर राजकारण न करता संयुक्तिकपणे हा निर्णय घेण्यात आला होता. या योजनेसाठी माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी कोणतेही प्रयत्न तर केलेच नाहीत, वर पुन्हा राजकारण करीत आहेत, अशी टीका शहर विकास आघाडीचे पक्षप्रतोद अजित जाधव यांनी पत्रकार बैठकीत केली.काळम्मावाडी पाणीपुरवठा योजना, आयजीएम हस्तांतरण याबाबत आमदार हाळवणकर वरिष्ठ शासकीय पातळीवर हालचाली करीत आहेत. शहराच्या पाण्यासाठी व आरोग्यासाठी राजकारण न आणता सर्वांच्यावतीने प्रयत्न करण्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनात नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे, खासदार राजू शेट्टी, आमदार हाळवणकर, माजी मंत्री आवाडे, माजी खासदार निवेदिता माने यांच्यासह विविध राजकीय प्रमुख व सर्व गटांचे नगरसेवक यांची संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला होता. त्याप्रमाणे हाळवणकर व शेट्टी यांनी प्रयत्नही सुरू केले आहेत. त्याला अन्य नेत्यांनीही पाठबळ द्यावे, असेही जाधव म्हणाले. आवाडे यांनी मंगळवारी पत्रकार बैठक घेऊन काळम्मावाडी व आयजीएमचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच अमृत सिटी योजनेमध्ये शहरासाठी दूधगंगेतून पाणी आणण्याची योजना केल्याचे दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत राजकारण न करता त्यांनी माहिती घेणे आवश्यक होते. स्मार्ट सिटीमध्ये शहराचा समावेश होण्यासाठी कमी खर्चाची एखादी पाणीपुरवठा योजना दाखविणे आवश्यक असल्याने अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार यांनी ही योजना दाखविली आहे. मात्र, काळम्मावाडीचा पाठपुरावा सुरूच आहे. तसेच आयजीएम रुग्णालय पीपीपी तत्त्वावर चालवायला देण्यासाठी शासनाकडून नगरपालिकेला पत्र आले आहे. त्यानुसार याबाबत सर्वांनुमते ठराव करून पाठविणे गरजेचे आहे. आवाडे यांनी आपल्या सदस्यांना सांगून याला पाठिंबा द्यावा. तसेच १२ कोटी रुपयांचे मंजूर झालेले रिंग रोड हे २०१० साली कॉँग्रेसची सत्ता असताना पाठविलेले होते. आताच्या खर्चाप्रमाणे त्यामध्ये बसत नसल्याने या रिंग रोडसह शहरातील अन्य सहा मुख्य रोड समाविष्ट करून ३२ कोटींचा फेरप्रस्ताव पाठविला आहे. अनंत चतुर्दशीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार असून, लवकरच तेही काम मार्गी लागणार आहे, असेही जाधव यांनी स्पष्ट केले.
पिण्याच्या पाण्यात आवाडेंनी राजकारण करू नये
By admin | Published: September 17, 2015 9:57 PM