लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारची गावपातळीवरची पहिली लिटमस टेस्ट म्हणून पाहिल्या जात असलेल्या ग्रामपंचायतीसाठी आज, शुक्रवारी मतदान होत आहे. जिल्ह्यातील निवडणूक जाहीर झालेल्या ४३३ पैकी ३८६ ग्रामपंचायतींमध्ये १५५३ केंद्रांवर ८ लाख ५६ हजार मतदार गावचे नवे ३ हजार ३०७ कारभारी निवडणार आहेत. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होणाऱ्या मतदानासाठी मतदान केंद्रासह संवेदनशील गावांमध्ये चार हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला आहे. सोमवारी (दि. १८) तालुक्याच्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे.
राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अशा तीन पक्षांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर पहिल्यांदाच गावपातळीवरील मोठ्या निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. कोल्हापुरातील ४७ ग्रामपंचायती आधीच बिनविरोध झाल्या आहेत, त्यामुळे उर्वरित ३८६ ग्रामपंचायतींसाठी गेल्या महिनाभरापासून गावागावांत राजकीय धुळवड उडाली. प्रचंड ईर्षेने लढविल्या गेलेल्या या निवडणुकीत पदयात्रा, कोपरा सभा, गल्लोगल्ली जाऊन भेटीगाठी यातून प्रचाराची राळ उडाली. निवडून येण्यासाठी एकेक मत महत्त्वाचे असल्याने मतदारांना बाहेर काढण्यासाठी खास यंत्रणा लावण्यात आली आहे. मतदानादिवशीच किंक्रांत आल्यामुळे राजकीय धुळवड उडणार आहे.