कोल्हापूर : अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या ४३३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान होणार आहे. येत्या मंगळवारी (दि. १५) तहसीलदार यांच्याकडून निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून या दिवसापासून आचारसंहिता लागू होईल. १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. आता निवडणुकीचा बिगुल वाजल्याने गावागावांमधील राजकारण तापणार आहे.
जिल्ह्यातील एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपलेल्या ४३३ ग्रामपंचायतींची निवडणूक कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. सोमवारी (दि. १४) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार मंगळवारी (दि. १५) तहसीलदार यांच्याकडून निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करण्यात येणार असून, या दिवसापासून निवडणुकीचा निकाल जाहीर होईपर्यंत आचारसंहिता लागू राहील. या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारेच होणार आहे.
कोरोना संकटानंतर होत असलेली ही निवडणूक जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. इच्छुक उमेदवार, समर्थक, स्थानिक सत्ता, गट-तट आणि स्थानिक राजकारण निवडणुकीच्या निमित्ताने ढवळून निघणार आहे.
---
निवडणूक कार्यक्रम असा
निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करणे : १५ डिसेंबर
उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत : २३ ते ३० डिसेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी : ३१ डिसेंबर
उमेदवारी अर्ज माघार व चिन्हवाटप : ४ जानेवारी
मतदान : १५ जानेवारी (सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच)
मतमोजणी : १८ जानेवारी
निवडणुकीच्या निकालाची अधिसूचना प्रसिद्धी : २१ जानेवारीपर्यंत
-----------
इंदुमती गणेश