कसबा बावडा : कसबा बावडा (ता. करवीर) येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यासाठी सोमवार (दि. २०) पासून रणधुमाळी सुरू होत आहे. कारखान्याच्या विविध गटातील २१ जागांसाठी २३ एप्रिलला मतदान होत आहे. निवडणूक जाहीर होण्याअगोदरच दोन्ही गटाकडून प्रचार यंत्रणा सक्रिय झाल्याने आगामी महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.‘राजाराम’ कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत २० एप्रिल २०२० ला संपलेली आहे. मात्र सभासदांवरून न्यायालयीन प्रक्रिया सुरू राहिल्याने निवडणूक लांबणीवर पडली होती. अखेर प्रक्रिया सुरू झाली असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार असून २७ मार्चपर्यंत मुदत राहणार आहे.
छाननीनंतर १२ एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून २३ एप्रिलला सकाळी आठ ते सायंकाळी पाच यावेळेत मतदान होणार आहे. २५ एप्रिलला मतमोजणी होणार आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव डॉ. पी. एल. खंडागळे यांच्या आदेशानुसार निवडणूक निर्णय अधिकारी निलकंठ करे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याअगोदरपासूनच सत्तारुढ गटाचे नेते, माजी आमदार अमल महाडिक व विरोधी गटाचे नेते आमदार सतेज पाटील यांनी प्रचार यंत्रणा सक्रिय केली आहे. त्यामुळे आगामी महिनाभर जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघणार आहे.दृष्टीक्षेपात ‘राजाराम’ कारखाना :
- कार्यक्षेत्र : हातकणंगले, करवीर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी, गगनबावडा
- मतदान : १३ हजार ५३८
- जागा : २१
- गाळप क्षमता : ३५०० टन प्रति दिनी (वार्षिक गाळप ४ लाख १५ हजार टन)
- सत्ता : २५ वर्षे माजी आमदार महादेवराव महाडिक यांची एकहाती सत्ता
असा आहे निवडणूक कार्यक्रम :
- उमेदवारी अर्ज दाखल : २० ते २७ मार्च
- अर्जांची छाननी : २८ मार्च
- माघारीची मुदत : २९ मार्च ते १२ एप्रिल
- मतदान : २३ एप्रिल
- मतमोजणी : २५ एप्रिल
अशा आहेत जागा :
- गट क्रमांक १ : २
- गट क्रमांक २ : ३
- गट क्रमांक ३: ३
- गट क्रमांक ४ : ३
- गट क्रमांक ५ : २
- गट क्रमांक ६ : २
- संस्था गट : १
- महिला प्रतिनिधी : २
- अनूसूचित जाती-जमाती :१
- इतर मागासवर्गीय : १
- भटक्या विमुक्त जाती, जमाती : १
‘राजाराम’ कारखाना खासगीचा सहकारी करण्यात आला. मात्र गेल्या २० वर्षापासून तो पुन्हा खासगी झाला आहे. तो सभासदांच्या मालकीचा करण्यासाठी हा लढा आहे. - आमदार सतेज पाटील (नेते, विरोधी आघाडी).
माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्या नेतृत्वाखाली ‘राजाराम’ कारखाना उत्तम प्रकारे सुरू आहे. सभासदांचा आमच्यावरच विश्वास असल्याने कौल आमच्या बाजूनेच मिळेल. - दिलीप पाटील (अध्यक्ष, राजाराम कारखाना)