लोकमत न्यूज नेटवर्कसरवडे : जिल्ह्यातील आजी-माजी मंत्री, आमदार यांच्या सहभागाने गाजलेल्या बिद्री (ता. कागल) येथील दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याच्या अटीतटीच्या लढतीत रविवारी ईर्ष्येने दुपारी एकपर्यंत पन्नास टक्क्यांवर मतदान झाले. दुपारी दोन वाजता कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावांत मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने मतदानाची प्रक्रिया थंडावली. किरकोळ बाचाबाची वगळता शांततेत मतदान झाले.‘बिद्री’च्या कार्यक्षेत्रातील कागल, राधानगरी, भुदरगड व करवीर या तालुक्यांतील २१८ गावांतील १८७ मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला. मतदान प्रक्रियेसाठी सुमारे १५०० अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आले होते. सकाळपासूनच पावसाची उघडीप असल्याने मतदारांनी मोठ्या उत्साहाने मतदान केले. सकाळी सात वाजल्यापासून उमेदवारांचे कार्यकर्ते मतदारांना केंद्रावर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आवाहन करीत होते, तर वयोवृद्ध मतदारांना चारचाकी गाडीतून आणले जात होते. मतदान केंद्रांवर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या, तर मतदान केंद्रांबाहेर दोन्ही आघाड्यांचे कार्यकर्ते जमावाने थांबले होते. काही कार्यकर्ते किती मतदान नोंद झाले याची आकडेवारी काढण्यात मग्न होते, तर काही कार्यकर्ते आपल्या मोबाईलवरून मतदानाची आकडेवारी घेत चर्चा करीत होते.कारखाना कार्यक्षेत्रातील सर्वाधिक मतदार असलेल्या बोरवडे, कसबा वाळवे, सरवडे, मुरगूड, निगवे खालसा, गारगोटी, आदी केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून येत होत्या. कारखान्याचे माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव यांनी तिरवडे येथे, तर के. पी. पाटील यांनी मुदाळ येथील मतदान केंद्रावर मतदान केले. सर्वाधिक मतदार असलेल्या गावांना दोन्ही आघाड्यांच्या प्रमुख नेतेमंडळींनी धावत्या भेटी दिल्या.पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आ. हसन मुश्रीफ, माजी अध्यक्ष के. पी. पाटील, समरजितसिंह घाटगे यांच्याविरुद्ध आमदार प्रकाश आबिटकर, प्रा. संजय मंडलिक, माजी आमदार दिनकरराव जाधव, माजी आमदार संजय घाटगे यांच्या पॅनेलमध्ये थेट लढत होत असल्याने त्यांची प्रतिष्ठा लागली असून, या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. यामुळे निवडणुकीत माजी अध्यक्ष दिनकरराव जाधव, के. पी. पाटील, माजी उपाध्यक्ष विजयसिंह मोरे, विठ्ठलराव खोराटे, गणपतराव फराकटे, बाबासाहेब पाटील, प्रवीणसिंह पाटील, ए. वाय. पाटील व नंदकिशोर सूर्यवंशी, राजेंद्र पाटील, आर. डी. पाटील, दत्तात्रय उगले, बाबूराव देसाई, के. जी. नांदेकर, धनाजीराव देसाई, नामदेव चौगले, श्रीपती पाटील, दिनकर कांबळे, जीवन पाटील, बाजीराव गोधडे यांच्यासह ४७ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. मंगळवारी दुपारनंतर कारखान्याची सत्ता कुणाकडे जाणार हे स्पष्ट होईल.सरवडेत किरकोळ बाचाबाची...सकाळी सरवडे (ता. राधानगरी) येथील मतदान केंद्राबाहेर कार्यकर्ते उभारण्याच्या कारणावरून दोन गटांत किरकोळ बाचाबाची झाली, परंतु प्रमुख नेतेमंडळींनी आणि पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने वादाचा प्रसंग टळला.‘बिद्री’त किरकोळ वादबोरवडे : बोरवडेसह बिद्री, वाळवे खुर्द, फराकटेवाडी व उंदरवाडी या गावांत शांततेत मतदान झाले. तर ‘ब’ वर्ग संस्था गटातील पैसे वाटपाच्या कारणावरून बिद्री कॉलनीमध्ये दोन गटांत मारामारी झाली. सर्वाधिक सभासद असलेल्या बोरवडेत दुपारी अडीचपर्यंत एक हजार चारशे सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
‘बिद्री’साठी ईर्ष्येने शांततेत मतदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 12:56 AM