कोल्हापूर : महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्या अत्यंत चुकीच्या झाल्या असून, त्यामुळे बहुसंख्य मतदारांवर अन्याय होणार आहे. निवडणूक यंत्रणेवर बाह्यशक्तींकडून हस्तक्षेप केला जात असल्यानेच या चुका झाल्या आहेत, असा गंभीर आरोप मंगळवारी काँग्रेस, राष्ट्रवादी, जनसुराज्य व शिवसेना, आदी पक्षांच्या नगरसेवकांनी केला. महानगरपालिकेत आयुक्त पी. शिवशंकर यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांना नगरसेवकांनी धारेवर धरून मतदार याद्यांतील चुकांबाबत जाब विचारला.महापालिका निवडणुकीची प्रारूप मतदार याद्या शनिवारी दुपारनंतर प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर रविवार व सोमवार दोन दिवस महापालिकेला सुटी होती. त्यामुळे मंगळवारी आयुक्त पी. शिवशंकर यांची वेळ घेऊन राष्ट्रवादी, काँग्रेस, जनसुराज्य व शिवसेनेचे नगरसेवक त्यांना भेटले. यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, सहायक आयुक्त उमेश रणदिवे, आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वच नगरसेवकांनी प्रारूप मतदार याद्या कशा चुकीच्या तयार झाल्या आहेत हे उदाहरणांसहीत सांगून त्याची चिरफाड केली. मनपा यंत्रणेवर बाह्यशक्तींकडून हस्तक्षेप होत असल्याचा गंभीर आरोप प्रा. जयंत पाटील यांनी केला. मतदार याद्या करणाऱ्या महाआॅनलाईन या शासननियुक्त संस्थेने जाणीवपूर्वक चुका केल्या आहेत. प्रगणक गट फोडणार नाही, असे सांगूनही प्रगणक गट फोडले आहेत. त्यामुळे मतदारांची अनेक नावे दुसरीकडेच गेली आहेत. विभागीय कार्यालयात मतदार याद्या पाहणीसाठी न ठेवता त्या प्रभागातील प्रत्येक मतदान केंद्रांवर ठेवाव्यात, अशी मागणीही पाटील यांनी केली. हरकतीप्रमाणे दुरुस्ती : शिवशंकर सोमवारपर्यंत मतदार यादींवर हरकती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या हरकती प्राप्त होतील त्यावर चौकशी करून निर्णय घेतला जाईल. त्यामुळे चुका हरकतीद्वारे दाखवून द्याव्यात, असे आयुक्तांनी सांगितले. विधानसभेसाठी तयार केलेली यादी ग्राह्य धरून ती राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फोडण्यात आलेली आहे. ‘महाआॅनलाईन’च्या माध्यमातून मतदार यादीची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. त्यात कोणाचा हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न झालेला नाही, असा खुलासाही त्यांनी केला. आयुक्तही संतप्तयावेळी राजेश लाटकर, शारंगधर देशमुख, चंद्रकांत घाटगे, आर. के. पोवार, संभाजी जाधव, मुरलीधर जाधव, सुनील पाटील, परिक्षीत पन्हाळकर, रमेश पोवार, बाळ मेढे, संभाजी देवणे, विनायक फाळके, उत्तम कोराणे, सतीश लोळगे, उपस्थित होते. यावेळी अधिकारी आणि नगरसेवकांत शाब्दिक चकमकही उडाली. त्यामुळे आयुक्त शिवशंकरही संतप्त झाले. १००-२०० मतदारांचे असे काही सांगू नका, स्पष्टपणे तक्रार द्या, असे आयुक्तांनी सुनावले. भांडणाचा फटका ‘महाआॅनलाईन’ ही कंपनी निवृत्त आयएएस अधिकाऱ्याची असून त्यांनी सरकारवर दबाव टाकून काम मिळविले आहे. काही अधिकाऱ्यांचा महाआॅनलाईनला काम देण्यास विरोध होता. त्यामुळे अधिकारी, आयोग आणि कंपनीच्या वादाचा हा फटका बसल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले. आडनावे गायब, मृत झाले जिवंत कोल्हापूर : मनपा निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत गंभीर स्वरूपाच्या तक्रारी झाल्याचे मंगळवारी तीव्रतेने जाणवले. मतदार यादीतील प्रशासनाच्या चुकांमुळे इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. मंगळवारी मनपा प्रशासनाकडे पहिल्याच दिवशी एकूण ५२ हरकती पोहोचल्या आहेत. यादी पाहताना अनेक प्रभागांत गंभीर चुका असल्याचे निदर्शनास येत आहे. अख्खी एक-एक गल्ली, १०० ते १००० मतदार एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जोडले गेले आहेत. अनेक ठिकाणी मृत व्यक्तींची नावे मतदार यादीत समाविष्ट झाली आहेत. काही प्रभागांत मतदारांची पहिली दोन नावे आहेत पण आडनावेच नाहीत, असेही प्रकार घडले आहेत. काही मतदार यादीत मतदारांचे पत्तेच नाहीत, त्यामुळे हे मतदार कोण आणि ते राहतात कुठे हेच समजत नाहीत. त्यांना शोधायचे कसे हाही एक प्रश्न आहे. प्रभाग क्रमांक ५६ (संभाजीनगर बसस्थानक) येथील घर क्रमांक ७१०, ७११, ७१३, व ७१४ मधील ३६० मतदारांची नावे ही प्रभाग क्रमांक ५७ (नाथा गोळे)मध्ये समाविष्ट झाली आहेत, तर नाथा गोळे प्रभागातील गवत मंडई परिसरातील ३४७ मतदारांची नावे ही संभाजीनगर बसस्थानक प्रभागामध्ये जोडली आहेत. याच प्रभागातील मतदार यादीत व्यक्तींची आडनावे नाहीत, अशी ५४ नावे समाविष्ट झाली आहेत. मतदार यादीतील घोळ लक्षात येताच उमेदवार, राजकीय पक्षाचे कार्यकर्ते यांची झोप उडाली आहे. सगळ्याच प्रभागांत उमेदवार मतदार यादीचा अभ्यास करत आहेत. बहुतेक सर्वच प्रभागांत घोळ झाला असल्याने मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल होण्याची शक्यता आहे. सोमवारपर्यंत (२८ सप्टेंबर) यादीबाबत हरकती नोंदवायच्या आहेत. प्रशासनाकडे हरकती येताच त्या दुरुस्त करण्याची यंत्रणाही प्रशासनाने तयारी केली आहे. माजी आयुक्त बिदरी यांचे नाव शिवाजी पार्क प्रभागातकोल्हापूर : मनपा निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारूप मतदार याद्यांतील घोळाचे अनेक नमुने समोर येत आहेत. महानगरपालिका माजी आयुक्त विजय सिंघल यांचे नाव विक्रमनगर प्रभागात असल्याचे सोमवारी निदर्शनास आल्यानंतर आता आणखी एक माजी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांचे नाव शिवाजी पार्क प्रभागातील मतदार यादीत आढळून आले आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना देण्यात येणारा बंगला ताराबाई गार्डन येथे आहे. त्यामुळे बंगल्याच्या पत्त्यावरच तेथे राहणाऱ्या व्यक्तींची नावे नोंद होतात. सिंघल यांची बदली २०११ मध्ये झाली तर बिदरी यांची बदली २१ जानेवारी २०१५ रोजी झाली. त्यामुळे दोघेही बदलीच्या ठिकाणी गेले परंतु त्यांची नावे मात्र महापालिका हद्दीतील मतदार यादीत राहिली आहेत. ही चूक संबंधितांची आहेत. त्यांनी आपली नावे वगळून नवीन नोकरीच्या ठिकाणच्या मतदार यादीत लावून घेणे अपेक्षित होते परंतु तसे झाले नाही. मतदार यादीतील नावाचा विषय जरी बाजूला ठेवला तरी प्रारूप मतदार यादीत या दोघांची नावे ताराबाई पार्क प्रभागात असायला पाहिजे होती परंतु विजय सिंघल यांचे नाव विक्रमनगर प्रभागात समाविष्ट झाले आहे तर विजयालक्ष्मी बिदरी यांचे नाव शिवाजी पार्क प्रभागात समाविष्ट आहे.अशी झाली चिरफाडशारंगधर देशमुख - रंकाळा तलाव प्रभागातील ९५० मतदारांची नावे गायब ? रमेश पोवार - ट्रेझरी प्रभागात भेंडे गल्ली, उमा टॉकीज परिसरातील मतदारांची नावे आलीच कशी? राजेश लाटकर - सर्वसाधारण एक प्रभाग ६००० ते ६५०० मतदारांचा होईल, असे सांगितले असताना तो ३५०० ते ८५०० मतदारांचा कसा?संभाजी जाधव - कैलासगडची स्वारी मंदिर प्रभागातील २२०० मतदारांची नोंद शिवाजी उद्यमनगर, मंगेशकरनगर प्रभागात कशी झाली? अनिल आवळे - माझ्या प्रभागात संंबंध नसताना तीन प्रभागांतील मतदार जोडलेच कसे?अजित राऊत - टिंबर मार्केटमधील पटेल समाजाची ५० मतदार पद्माराजे प्रभागात कसे आले? प्रकाश नाईकनवरे- माझ्या प्रभागात शिवाजी उद्यमनगर, साईक्स एक्स्टेंशन प्रभागाची २००० मते जोडण्यात आलीत.
मतदार याद्यांची चिरफाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2015 12:22 AM