कोपार्डे : करवीर तालुक्यात ५४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. तालुक्यात २०५ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. २२२ केंद्रांपैकी १७ मतदान केंद्रे बिनविरोध झाली असून २०५ केंद्रांवर ही निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.
करवीर तालुक्यातील ५४ ग्रामपंचायतींच्या ५५८ जागांसाठी निवडणूक होणार होती. यात खाटांगळे, आरे, उपवडे, म्हारुळ, चाफोडी गावांच्या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत, तर कुर्डू -१, इस्पुर्ली -१, नागदेववाडी-१, साबळेवाडी -१, बालिंगा -३, आडूर २, सांगवडे - १, कोथळा - ७ जागांची बिनविरोध निवड झाली आहे. एकूण १२४७ जागांपैकी ७८ जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. ११७१ उमेदवारांचे भवितव्य शुक्रवार (दि. १५) रोजी मतपेटीत बंद होणार आहे.
निवडणूक अधिकारी तहसीलदार शीतल भामरे-मुळे यांनी मतदान व्यवस्थेचे नियोजन केले आहे. प्रत्येक केंद्रावर एका केंद्राध्यक्षासह सहा कर्मचारी असणार आहेत. याशिवाय सर्व केंद्रांवर मदतीसाठी ३४ आर ओ देण्यात आले आहेत. एखाद्या मतदान केंद्रावर वोटिंग मशीन नादुरुस्त, काही त्रुटी, अथवा मतदानाबाबत आक्षेप आल्यास केंद्राधिकाऱ्यांना आर ओंंची मदत होणार आहे. याशिवाय स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांची मदतही घेण्यात येणार आहे. मतदान शांततेत पार पाडून लोकशाही प्रक्रिया शांततेत पार पाडण्याचे आवाहन निवडणूक अधिकारी तहसीलदार शीतल भामरे-मुळे यांनी केले आहे.