लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाळी नदी प्रदूषित करण्यात सर्वात जास्त कारणीभूत असलेल्या मलकापूर नगरपालिकेने गेल्या पंधरा वर्षांच्या नियोजनशून्य कारभारामुळे संपूर्ण नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. पालिकेने गेल्या दहा वर्षांपासून १ कोटी रुपयांची नळपाणी पुरवठा योजना बंद ठेवली आहे. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत आहे. यामुळे नदीच्या पाण्याला उग्र वास येत आहे. नागरिकांना नदी काठावरून जाताना तोंडाला रुमाल लावावा लागत आहे.
शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये पालिका प्रशासनाविरुद्ध असंतोष खदखदत आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी इकडे फिरकलेले नाहीत.
शाळी नदीचा उगम पालेश्वर गावच्या डोंगर कपारीतून झाला आहे. या नदीवर पाटबंधारे विभागाने दीड टीएमसीचे धरण बांधले आहे. मलकापूर शहराच्या बाजूने शाळी नदी वाहत आहे. पालिका स्थापन झाल्यापासून या नदीचे पाणी शहरातील नागरिक वापरत आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शाळी नदीत शहरातील सांडपाणी, गटाराचे पाणी थेट मिसळत आहे. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित होत आहे. नदीवर उन्हाळ्यात येळाणे गावाजवळ धरण बांधल्यामुळे नदीचे पाणी अडविले जाते. त्या पाण्यात सांडपाणी मिसळत आहे. पालिका प्रशासनाने नदीच्या प्रदूषित पाण्याकडे गांभीयाने पहिलेले नाही. स्वच्छ भारत अभियानात पालिकेला १० कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. मात्र पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी फारसे काम केले नाही. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे येथील महिलांना कपडे धुण्यासाठी व जनावरांना पाणी पाजण्यासाठी एक किलोमीटर उचत किंवा पेरीड गावच्या हद्दीतील नदीत जावे लागत आहे. शाळी नदीचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे मलकापूर, येळाणे, कोपार्डे या गावांतील नागरिक व शेतकरी यांना होत आहे. पालिकेवर जनसुराज्य पक्ष, भाजप, शिवसेना या तीन पक्षांचे नगरसेवक निवडून जातात. यांची आलटून-पालटून सत्ता येते. नागरिकांना दिलेल्या आश्वासनांचा त्यांना विसर पडला.
‘अक्षम्य दुर्लक्ष’
पालिकेवर जनसुराज्य, भाजप व दलित महासंघाच्या युतीची सत्ता आहे, तर विरोधी गट म्हणून शिवसेना कार्यरत आहे. मात्र या दोन्हीही नदीच्या प्रदूषणाकडे यांनी दुर्लक्ष केले आहे. याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.
फोटो
मलकापूर शहरातील सांडपाणी व गटारीचे पाणी शाळी नदीत मिसळत असल्यामुळे संपूर्ण पाणी प्रदूषित होऊन पाण्याला उग्र वास येत आहे.