कोल्हापूर : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाजवळच काळे, फेसाळलेले दूषित पाणी उघड्यावर आल्याचे शिरोळ तालुका स्वाभिमानी युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यामुळे बुधवारी दिवसभर शिरोळ तालुका स्वाभिमानी युवा आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत ‘प्रदूषण’च्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. दूषित पाण्याचे नमुने घेतले.औद्योगिक वसाहतीमधील काही उद्योगांमधील दूषित पाणी, प्रक्रिया न करताच बाहेर सोडले जात असल्याची तक्रार शिरोळ तालुका स्वाभिमानी युवा आघाडीचे अध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालिघाटे, सचिन शिंदे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रशासनाकडे केली. तक्रारदारांसह प्रदूषणच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यावेळी सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाशेजारीच खणलेल्या नाल्यात काळे, फेसाळयुक्त पाणी वाहताना दिसले. हे पाणी तळंदगे गावातील नाल्यामार्गे पंचगंगा नदीत मिसळत असल्याचेही पुढे आले. औद्योगिक वसाहतीमधील जुन्या सामुदायिक सांडपाणी प्रकल्पात साठलेले, दोन्ही बाजूकडील नाला, प्रकल्पातील इनलेट व आउटलेट येथील पाण्याचे नमुने घेतले. यावेळी जुन्या प्रकल्पातील गाळ काढण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले. हे काम ८५ टक्के पूर्ण झाल्याची माहिती औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रतिनिधींनी यावेळी दिली.सामुदायिक सांडपाणी प्रकल्पाला जोडलेल्या पाच उद्योगांच्या प्रक्रिया केंद्रात पाणी साठून डबके निर्माण झाले. एका केंद्रात साठलेले पाणी पाईपलाईनजवळच्या नाल्यात जात होते, नवे बांधलेले सामुदायिक सांडपाणी प्रकल्प पूर्ण झालेले नव्हते. अशा त्रुटी जलस्त्रोत दूषित करणाऱ्या पाहणीत दिसून आल्या आहेत.
‘प्रदूषण’च्या प्रशासनाने केला पंचनामा
By admin | Published: June 11, 2015 12:56 AM