पोर्ले तर्फे ठाणे : आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा) येथील दत्त (दालमिया शुगर कंपनी) साखर कारखान्याचे मळीमिश्रित सांडपाणी कच्च्या आणि पक्क्या लघुमला (तळी) गळती लागून ओढ्यात जात असल्याची तक्रार राज्य प्रदूषण मंडळाकडे आली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री प्रदूषण मंडळाचे उप-प्रादेक्षिक अधिकारी मनीष होळकर, क्षेत्र अधिकारी डॉ. राजेश ओटी, कंपनीचे अधिकारी पंकज शाही, तक्रारदार दिनकर चौगुले यांच्या उपस्थितीत पाहणी करून अहवाल तयार करण्यात आला. अधिकाऱ्यांनी कच्चे लघुम पूर्णत: बुजवून घ्यावेत. पक्क्या लघुमची गळती पूर्णत: बंद केलेला अहवाल कंपनीने प्रदूषण मंडळाकडे सादर करावा, असा आदेश दिला. कोणत्याही परिस्थितीत कंपनीने प्रक्रिया व विनाप्रक्रिया केलेले मळीमिश्रित पाणी आसुर्ले गावच्या ओढ्यात तसेच कासारी नदीत मिसळणार नाही, परिसरातील जमिनीत दूषित पाणी मुरविले जाणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी समज कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रदूषण मंडळाचे उप-प्रादेक्षिक अधिकारी मनीष होळकर यांनी दिली. कारखान्यातून प्रक्रिया करून विसर्गत होणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रियेसाठी गतवर्षी तीन पक्के लघुम बांधले होते. त्याला गळती लागली आहे. पहिले दोन लघुम भरल्याने तिसऱ्या लघुममध्ये तीन ठिकाणी पाण्याचे उमाळे येतात. तसेच कच्चे लघुम तयार करून पाणी प्रक्रियेस मंडळाची मनाई असताना कारखान्याने काल रात्री दूषित पाणी साठविलेले दोन लघुम तातडीने बुजविले. त्यामुळे हंगाम सुरू करण्याबाबत प्रदूषण मंडळाने परवानगी दिलीच कशी, असा सवाल दिनकर चौगुले यांनी केला. (वार्ताहर)कंपनीने दूषित पाण्यासाठी बांधलेले लघुम निकृष्ट दर्जाचे आहेत. त्यामुळेच गळती लागली आहे. दूषित पाणी जमिनीत मुरल्याने पर्यावरण व शेतजमिनीवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. प्रदूषण मंडळाने व वनविभागाने कंपनीवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा न्यायालयात जाणार आहे.- दिनकर चौगुले, पोर्ले तर्फ ठाणेतक्रारीनुसार आम्ही मंगळवारी (दि. १०) रात्री कारखान्यावर कच्चे लघुम व पक्क्या लघुमची पाहणी केली आहे. त्याचा अहवाल तयार केला असून, वरिष्ठांना अहवाल सादर करून पुढील कारवाई केली जाणार आहे. - मनीष होळकर, उपप्रादेशिक अधिकारी
‘दालमिया’तील दूषित पाण्याची ‘प्रदूषण’कडून पाहणी
By admin | Published: February 12, 2015 11:33 PM