कुरुंदवाड : प्रदूषित पाण्यामुळे पंचगंगा नदीवरील तेरवाड बंधाऱ्यावरील मृत माशांचा पंचनामा, तसेच दूषित पाण्याची पाहणी करण्यासाठी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बंधाऱ्याच्या कठड्याला दोरखंडाच्या साहाय्याने बांधून घालून संताप व्यक्त केला. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांत झालेल्या बाचाबाचीमध्ये काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. अखेर पर्यावरणप्रेमी उदय गायकवाड यांच्या शिष्टाईने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सदस्य सचिव अशोक शिंगारे यांनी आंदोलनकर्त्यांना, इचलकरंजी पालिकेने नदीपात्रातील मृत माशांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावावी, टाकवडे काळ्या ओढ्यावर तीन बंधारे ७२ तासात घालून क्लोरिन डोस करणे आणि इचलकरंजीचे मुख्याधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर, क्षेत्र अधिकारी हरबड यांची सुटका केली.
आंदोलनात स्वाभिमानी युवा आघाडी तालुकाध्यक्ष बंडू पाटील, विश्वास बालीघाटे, रघू नाईक, अभिजित आलासे, अमीर नदाफ आदी सहभागी झाले होते.
फोटो - २३१२२०२०-जेएवाय-०५
फोटो ओळ -
तेरवाड (ता. शिरोळ) येथील पंचगंगा बंधाऱ्यावर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यास बांधून घातले.