कोल्हापूर : शहरातील रस्त्यावरील डांबर उखडून गेल्याने ते खराब झाले असून, सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरले आहे; त्यामुळे हवा प्रदूषण होत असून, त्यासाठी जबाबदार असणाऱ्या शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सोमवारी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली; यासाठी टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी गायकवाड यांना आंदोलकांनी शहरातील रस्त्यावरून फिरवून वस्तुस्थिती दाखविली. ती त्यांनी मान्यही केली.दुपारी बाराच्या सुमारास महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, कार्याध्यक्ष चंद्रकांत भोसले यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांना तोंडाला मास्क बांधूनच निवेदन सादर केले.यावेळी शहरातील रस्ते खराब झाले असून, रस्त्यावरील डांबर उखडून गेले आहे. त्यातील मुरुम व माती रस्त्यावर आली असून, त्यामुळे धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे नागरिकांना प्रदूषणाचा त्रास होऊन श्वसनाचे विकार होत आहेत.
याची दखल घेऊन उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी २ नोव्हेंबरला महापालिकेचे शहर अभियंता सरनोबत यांना नोटीस बजावली आहे; परंतु त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देवणे व भोसले यांनी केली.यावर हे आपल्या अखत्यारित येत नसल्याचे गायकवाड यांनी सांगताच, आंदोलकांनी त्यांना वस्तुस्थिती दाखविण्यासाठी छत्रपती शिवाजी चौकात आणले. त्यांना सोबत घेऊनच आंदोलकांनी पापाची तिकटीपर्यंत खराब रस्त्याची स्थिती दाखविली. तसेच यामुळे उडणाऱ्या धुळीने व्यापाऱ्यांच्या विक्रीयोग्य वस्तू खराब झाल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
व्यापाऱ्यांनीही तीव्र प्रतिक्रिया गायकवाड यांच्यासमोर मांडल्या. शेवटी गायकवाड यांनी वस्तुस्थिती मान्य केली; परंतु जोपर्यंत सरनोबत यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, तोपर्यंत आंदोलन थांबविणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. आंदोलनात राजू जाधव, विजय गायकवाड, अशोक जाधव, दिलीप सूर्यवंशी, पोपट रेडेकर, तानाजी पाटील, उदय गायकवाड, नीलेश हंकारे, आनंदा चिले, इजाज फरास, नागेश बुचडे, चंदू पाटील, आदींचा सहभाग होता.