भारत चव्हाण ।कोल्हापूर : कसबा बावडा येथे७६ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले अद्ययावत सांडपाणी प्रक्रिया केंद्र गेल्या ४० दिवसांपासून बंद राहण्याला केवळ आणि केवळ महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणाच कारणीभूत असल्याची बाब मंगळवारी समोर आली. जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांनी ड्रेनेजलाईनचे काम युद्धपातळीवर करून घ्या, अशा स्पष्ट सूचना दिल्या असताना तसेच विद्युत पुरवठा खंडित करण्याचा व फौजदारी कारवाई करण्याचा इशारा देऊनही या सूचनांकडे मनपाने दुर्लक्ष केले आहे.
महानगरपालिका प्रशासनाचा हा निष्काळजीपणा नागरिकांच्या जिवावर उठण्यापूर्वी कारवाई म्हणून मुख्य प्रशासकीय इमारतीमधील विद्युत पुरवठा खंडित करावा, तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण करीत असल्याबद्दल पाटबंधारे विभागानेही स्वतंत्रपणे महापालिकेविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
कोल्हापूर शहरातील ८० एमएलडी मैलामिश्रित सांडपाणी रोज प्रक्रियेविना पंचगंगा नदीत मिसळत असल्याचा सचित्र वृत्तांत ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात प्रसिद्ध केला. त्यामुळे पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला.
१३ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर जयंती नाल्याला आलेल्या पुरामुळे तेथील सांडपाणी वाहून नेणारी पाईपलाईन तुटल्याने सांडपाणी प्रक्रिया केंद्राकडे होणारा सांडपाणी पुरवठा बंद झाला. त्यामुळे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद ठेवावे लागत असल्याचे पत्र १४ सप्टेंबरला केंद्राच्या हाताळणीचे काम पाहत असलेल्या विश्वा इन्फ्रा. कंपनीने जलअभियंत्यांना पाठविले. त्याच्या दुसºयाच दिवशी म्हणजे १५ सप्टेंबरला प्रदूषण नियंत्रण मंडळाने पत्र लिहून तातडीने कार्यवाही करावी, अशी सूचना दिली. युद्धपातळीवर काम पूर्ण करण्यात यावे, मैलामिश्रित सांडपाणी निर्जंतुकीकरण करण्यात यावे, नदीप्रवाहाच्या खालील गावांना नदीच्या पाण्याऐवजी पर्यायी स्रोतांचा वापर करण्यास सांगावे आणि जुने सांडपाणी प्रक्रिया केंद्र तात्पुरते सुरू करावे, अशा चार प्रमुख सूचना मंडळाने महापालिकेला केल्या होत्या. मात्र, आजही या सूचनांकडे पालिकेने गांभीर्याने लक्ष दिलेले नाही.नियंत्रण समितीची आज बैठक‘लोकमत’मध्ये मंगळवारी वृत्त प्रसिद्ध होताच आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी तत्काळ आज, बुधवारी सकाळी अकरा वाजता आयुक्त कार्यालयात शहरस्तरीय नियंत्रण समितीची बैठक आयोजित केली आहे. या समितीवर जलअभियंता, कन्सल्टंट सोनटक्के , कसबा बावडा व दुधाळी एसटीपीचे प्रोप्रायटर, शिवाजी विद्यापीठाच्या टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता गिरीष कुलकर्णी, एमआयडीसीचे निवृत्त कार्यकारी अभियंता एस. व्ही. वराळे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर, उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड यांचा या समितीत समावेश असून सर्वांना बैठकीची सूचना देण्यात आली आहे.प्रदूषण नियंत्रण मंडळ पाहणी करणार‘लोकमत’मधील वृत्ताची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी दिलीप खेडकर, उपप्रादेशिक अधिकारी राज कामत, पर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड हे आज, बुधवारी सकाळी नऊ वाजता सांडपाणी प्रक्रिया केंद्र, तसेच जयंती नाला येथील तुटलेल्या जलवाहिनीची पाहणी करणार आहेत. प्रक्रिया केंद्राचे तसेच जयंती नाल्याचे चित्रीकरण केले जाण्याची शक्यता आहे.जिल्हाधिकाºयांची सूचना बासनातजिल्हाधिकारी कार्यालयात दि. १७ सप्टेंबरला काही पर्यावरणप्रेमी कार्यकर्त्यांनी मैलामिश्रित सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्याची बाब जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा जिल्हाधिकाºयांनी युद्धपातळीवर काम पूर्ण करा, निविदा काढण्यात वेळ घालवू नका, अशा सूचना मनपाला दिल्या. शिवाय दि. २० सप्टेंबरला आयुक्त अभिजित चौधरी यांना डी. ओ. लेटर लिहून या विषयाकडे गांभीर्याने पाहण्याची विनंती केली होती.आयुक्तांवर कारवाई करावीपर्यावरणप्रेमी कार्यकर्ते उदय गायकवाड यांनी महापालिकेच्या निष्काळजीपणाबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, तसेच जिल्हाधिकाºयांनी सांगूनही महापालिका प्रशासन त्यांच्या सूचनांचे पालन करीत नाहीत ही गंभीर बाब आहे. त्यामुळे आयुक्तांवरच कारवाई झाली पाहिजे. तसेच ज्या ठेकेदाराने पाईपलाईनचे काम केले होते त्याच्यावरसुद्धा कारवाई केली पाहिजे, अशी मागणी गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली. जर महापालिका प्रशासनाने तुटलेली जलवाहिनी तत्काळ जोडली नाही, तर प्रदूषण नियंत्रण कायद्यातील ‘कलम ३२’प्रमाणे हे काम प्रदूषण नियंत्रण मंडळाने पूर्ण करावे आणि झालेल्या खर्चाची वसुली महापालिकेकडून वसूल करावी, अशी सूचना गायकवाड यांनी केला.