शिवराज लोंढे
लोकमत न्यूज नेटवर्क
सावरवाडी : भौगोलिक दृष्टिकोनातून सह्याद्री पर्वतरांगांच्या अखेरचा टप्पा असलेल्या आणि प्राचीन संस्कृतीचा वारसा लाभलेल्या, थंड हवेचे ठिकाण असलेल्या करवीर तालुक्यातील पश्चिम भागातील सातेरी महादेव पर्यटन स्थळाला सध्या प्रदूषणाचा विळखा अधिक घट होऊ लागला आहे. नैसगिक साधनसंपत्तीबरोबर ऐतिहासिक पर्यटन क्षेत्रात नव्या बदलत्या युगात वाढत्या प्रदूषणाचा नैसगिक वातावरणावर परिणाम होऊ लागला आहे.
वाढत्या प्रदूषणामुळे जीवसृष्टीवर ग्रामीण पर्यावरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
सह्याद्री पश्चिम पर्वतरांगांमध्ये सातेरी महादेव परिसराचा समावेश आहे. डोंगरी प्रदेशात सातेरी व महादेव अशी दोन तीर्थक्षेत्रे आहेत. या परिसराला राज्य शासनाने तीर्थक्षेत्र क दर्जा प्राप्त केला आहे. माजी आमदार चंद्रदीप नरके यांच्या पुढाकाराने सातेरी महादेव परिसरात भक्तनिवास, रस्ते दुरुस्ती, वाहनतळ, पाणी, वीजपुरवठा आदी विकास कामांसाठी गेल्या दहा वर्षात शासकीय फंड खर्च केला.
दळणवळण साधनांची सोय झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. रविवार, सोमवार या दोन दिवसात पर्यटकांची गर्दी प्रचंड असते शिवाय जंगली वृक्षाच्या ठिकाणी पर्यटकांच्या जेवणावळ्या सुरू असतात.
सातेरी परिसरात मात्र दिवसभर पर्यटकांच्या भोजनावळ्यांचे प्रस्थ वाढलेले आहे त्यामुळे दारूच्या बाटल्या, पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, शिळे अन्न टाकून देण्याचे प्रकार अलीकडच्या काळात वाढू लागले आहेत. उघड्या जागी कचऱ्याच्या ढिगांचे साम्राज्य वाढू लागले आहे
सातेरी महादेव पर्यटन स्थळावर कोणतीही कारखानदारी नाही. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून स्वच्छ परिसर असूनही पर्यटकांच्या बेफिकीरपणामुळे या परिसराला प्रदूषणाचा विळखा घट्ट होऊ लागला आहे. प्रदूषणाबाबत कोणाचेही या परिसराकडे लक्ष नाही . वाढत्या प्रदूषणाचा नैसर्गिक सृष्टीवर परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. सातेरी महादेव पर्यटन क्षेत्रात "प्रदूषण टाळा, निसर्ग वाचवा" या बाबत सेवाभावी संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे
पर्यटनस्थळी स्वच्छतेकडे दुर्लक्ष
सातेरी महादेव पर्यटन क्षेत्राच्या परिसरात कचरा उठावाबरोबर स्वच्छतेकडे कोणाकडूनच लक्ष दिले जात नाही .
चौकट २ ) - = मद्यपी लोकांचा वाढता वावर
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या परिसरात मद्यपी लोकांचा सुटीच्या दिवशी वाढता वावर आहे त्यामुळे दारूच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या यांचे ढीग जागोजागी आढळत आहेत .
फोटो ओळ = सातेरी महादेव (ता. करवीर) येथील पर्यटन स्थळाला प्रदूषणाचा विळखा, पर्यटन क्षेत्र परिसरात कचरा वाढू लागला आहे.