आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. २८ : कोल्हापूरातील आठवडी बाजारात भाज्यांची आवक कमी आल्याने काही भाज्यांच्या दरात वाढ झाली तर फळांचा राजा आंब्यासह अननस आणि खरबूज घेण्यासाठी ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. खरबूज ४० रुपयांपासून ते ५० रुपयापर्यंत तर अननसचा दर उतरुन तो ३० रुपयांच्या घरात गेला होता. दुसरीकडे, मुस्लिम बांधवांचे रमजान रोजे (उपवास) रविवारपासून सुरु झाल्याने ड्रायफुटला विशेषत : खजूरला मागणी होती.
साधा खजूर प्रतिकिलो ४० रुपये व काळा खजूर दोनशे ते २४० रुपये असा होता. मात्र, तेल, तूरडाळ व तांदूळाचे दर जैसे थे होते. शहरातील लक्ष्मीपुरी या रविवारच्या आठवडी बाजारासह कपिलतीर्थ मार्केट, राजारामपुरीतील नार्वेकर मार्केट, गंगावेशमध्ये भाज्यांची आवक कमी आली होती. त्यामुळे वांगी, टोमॅटो, ढब्बु मिरची, गवार, वाल, दूधी भोपळा, मेथी, पोकळाच्या दरात वाढ झाली तर ओली मिरची, भेंडी, दोडका, फ्लॉवर, मक्का कणिस, ओली भुईमुग शेंग, पडवळ, पालक याचे दर कमी झाले होते.
अननसमध्ये राजा व राणी असे दोन प्रकार होते.विशेषत : अतिशय गोड असलेल्या राणी अननसला जास्त मागणी होती.राणीचा दर ८० रुपये तर राजा ४० रुपयाला होता. त्याचबरोबर या आठवड्यात काजूच्या दरात सुमारे प्रतिकिलो ७० रुपयांनी वाढ झाली आहे.तो ९०० रुपये गेला आहे.बदाम ७०० रुपये,चारोळी एक हजार,बेदाणे २२० रुपये असा प्रतिकिलो होता.परंतु,सर्व प्रकारच्या डाळी,तांदूळ व तेलाचे दर जैसे थे होते.फळांमध्ये मोसंबी,संत्री,चिक्कु,सफरचंद (फॉरेन)च्या दरात वाढ झाली आहे.मोसंबी (चुमडे)५५० रुपये,संत्री(कॅरेट)९५० रुपये,लिंबू (चुमडे) ७२० रुपये झाली आहेत.
सांगली बाजारातून अननस व खरबूज आणला आहे. गेल्या आठवड्यात अननसचा दर ६० ते ८० रुपयांच्या घरात होता. तो दर या आठवड्यात निम्म्याने कमी झाला आहे.खरबूज व अननस हे आरोग्याला हितकारक असते.
-अस्लम बागवान,
अननस विक्रेते,लक्ष्मीपुरी.