कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन ज्या त्या प्रभागांमध्ये करण्याचे नियोजन आहे. परिसरातील मैदो, मोकळ्या जागा, रिकाम्या जागा या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड ठेवण्यात येणार आहेत.
राज्य शासनाकडून दरवर्षी ज्या ठिकाणी गर्दी होते, त्या ठिकाणी गणेशमूर्ती विसर्जनाला प्रतिबंध घालण्यात आला आहे. यामुळे पंचगंगा नदी, रंकाळा तलाव येथे विसर्जन करू नये, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ९० ठिकाणी तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे.कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने राज्य शासनाकडून घरगुती तसेच सार्वजनिक गणेशमूर्तींचे आगमन आणि विसर्जनासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यामध्ये दरवर्षी ज्या परिसरात गर्दी होते, तेथे गणपती विसर्जनासाठी प्रतिबंध घालण्यात आले आहेत.
यानुसार पंचगंगा नदी आणि रंकाळा तलाव या परिसरात गणेशमूर्ती विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी न येता ज्या-त्या प्रभागांमध्येच विसर्जन करण्याची सुविधा देण्याचे नियोजन महापालिकेच्या प्रशासनाकडून सुरू आहे. दोन दिवसांत अंतिम नियोजन होणार असून, ते जाहीर केले जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या प्रशासनाने दिली आहे.प्रत्येक प्रभागात तात्पुरते विसर्जन कुंडमहापालिकेतर्फे प्रत्येक प्रभागात तात्पुरते विसर्जन कुंड ठेवण्याचे नियोजन आहे. शहरातील रिकाम्या जागा, मैदाने, खुल्या जागा अशा किमान ९० ठिकाणी विसर्जन कुंड ठेवले जाणार आहेत. या ठिकाणी संकलित होणाऱ्या गणेशमूर्ती ट्रॅक्टरच्या साह्याने नेऊन महापालिकेचे कर्मचारी इराणी खण येथे त्यांचे विसर्जन करणार आहेत. यासाठी २०० ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर घेतले आहेत.निर्माल्याची खतनिर्मितीविसर्जन कुंड येथे निर्माल्य संकलित केले जाणार आहे. संकलित होणारे निर्माल्य एकटी व अवनि या संस्थांना खतनिर्मितीसाठी दिले जाणार आहे. याचबरोबर परिसरातील उद्यानांमध्ये ही निर्माल्य स्वीकारून त्या ठिकाणीही खतनिर्मिती करण्याचे नियोजन आहे.
नागरिकांनीही मूर्ती आणण्यासाठी गर्दी टाळावीसोशल डिस्टन्सिंगचे पालन व्हावे यासाठी महापालिकेकडून गणेशमूर्ती आगमन आणि विसर्जनासाठी नियोजन सुरू आहे. कुंभार बांधवांनी शक्यतो गणपतीच्या मूर्ती एकाच ठिकाणी न देता वेगवेगळ्या ठिकाणी देण्याची सोय करावी. मूर्ती लहान असावी. नागरिकांनीही मूर्ती आणण्यासाठी गर्दी टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी दहा बाय दहा फूट मंडपाला परवानगीसार्वजनिक गणेशोत्सवासाठी दहा बाय दहा फूट मंडपाला परवानगी देण्यात आली आहे. मूर्तीची उंची चार फूट ठेवण्यात यावी. आगमन आणि विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही. देखावे सादर करण्यास बंदी आहे. ज्या मंडळांच्या ठिकाणी गर्दी होते. अशा मंडळांनी दर्शनासाठी ऑनलाईन सुविधा द्याव्यात. विसर्जन मार्गावर स्वागत कक्षाला परवानगी नसेल. मंडळांनीही घरगुतीप्रमाणे प्रभागांमध्ये मूर्तीचे विसर्जन करावे, अशा सूचना राज्य शासनाने केल्या आहेत.