: वडिलांनी दाखविला मार्ग,
शेतकरी कुटुंबातील मुलगी केंद्रीय राखीव पोलीस दलात
शिवानंद पाटील
गडहिंग्लज : केवळ जिद्द आणि कष्टाच्या जोरावर ती केंद्रीय राखीव पोलीस दलात (सीआरपीएफ) भरती झाली. बेळगाव जिल्ह्यातील या २२ वर्षीय लेकीचे नाव आहे पूजा अरविंद चव्हाण. सीमाभागातील ती पहिली महिला 'कोब्रा कमांडो' ठरली आहे.
गडहिंग्लजपासून १२ कि.मी. अंतरावरील हुक्केरी तालुक्यातील चार हजार लोकसंख्येचे मतीवडे हे तिचे गाव आहे. याठिकाणी फारशा सोयी-सुविधा नाहीत. त्यामुळे येथील लोकांना गडहिंग्लज, संकेश्वर व निपाणी या जवळच्या शहरांवरच अवलंबून राहावे लागते.
पूजाचा प्रवासही याच खेड्यातून सुरू झाला. तिचे वडील अरविंद यांनी वर्तमानपत्रात आलेली
सीआरपीएफ भरतीची जाहिरात
तिला दाखवली आणि त्यासाठी प्रयत्न करण्याचे सांगितले.
२०१७ मध्ये सीआरपीएफमध्ये भरती झाल्यावर तिने अजमेरमध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण केले. रिव्हॉल्वर, रायफल चालविण्याबरोबरच कार्बाइन, एल. एम. जी. बाॅम्ब फोडणे अशा अनेक गोष्टी तिने आत्मसात केल्या आहेत.
प्रशिक्षणार्थी २०० मुलींमधून ५ मुलींची 'कोब्रा कमांडो'साठी निवड झाली. त्यात पूजाचाही समावेश आहे. कमांडोच्या पाच महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर तिची छत्तीसगड किंवा गडचिरोली येथे नियुक्ती होणार आहे.
केवळ शेती हेच उपजीविकेचे साधन असलेल्या गरीब कुटुंबातील ही कन्या 'कोब्रा कमांडो बटालीयन'साठी तयार झाली आहे. तिचा हा प्रवास सीमाभागातील युवक-युवतींसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
लेकीचं यश पाहण्यापूर्वीच..!
इंग्रजी विषयातून पदवी घेतलेल्या पूजाने वडिलांचा शब्द प्रमाण मानून जिद्दीने व मेहनतीने त्यांचे स्वप्न साकार केले. परंतु, लेकीचे यश पाहण्यापूर्वीच अरविंद यांचा कर्करोगाने मृत्यू झाला. त्याचे शल्य तिच्यासह पंचक्रोशीतील सर्वांना आहे.