अजित चंपुण्णावर -- बुबनाळ (ता़ शिरोळ) येथील दहावी परीक्षेत ८१ टक्के गुण मिळविणाऱ्या अनाथ जिद्दी पूजा राजाराम राजमाने हिला पालकत्व मिळाले आहे़ म्हाकवे (ता़ कागल) येथील जिल्हा परिषदेचे निवृत्त कक्ष अधिकारी बाजीराव पाटील यांनी पूजाच्या शिक्षणापासून ते तिच्या कन्यादानापर्यंतचा येणारा सर्व खर्च आपल्या स्वकमाईतून करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे़येथील पूजाचे वडील राजाराम व आई मीनाक्षी राजमाने यांनी कर्जबाजारीपणास कंटाळून मे २०१० साली आत्महत्या केली होती़ यात तिच्या भावाचा या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला होता़ एकीकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर असताना लहानपणीच पूजा अनाथ झाली होती़ कर्जापोटी सर्व मालमत्ता गहाण असताना उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर होता़ अशा परिस्थितीत ८० वर्षांच्या जिद्दी आजीने म्हैस बाळगून पूजाचे संगोपन केले व शिक्षणही सुरूठेवले़ आजीच्या जिद्दीला पूजानेही साद घातली व दहावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळविले़दरम्यान, या अनाथ जिद्दी पूजाचे वृत्त ‘लोकमत’मधून दि़ ९ जूनच्या अंकात ‘बुबनाळमधील अनाथ पूजाच्या जिद्दीला बळ’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झाले होते़या बातमीची दखल घेऊन म्हाकवे (ता़ कागल) येथील ‘बाजीराव पाटील’ यांनी बुबनाळचे ‘लोकमत’चे बातमीतदार अजित चंपुण्णावर यांच्याशी संपर्क साधून पूजाची माहिती घेतली व त्यांनी पूजाचे ‘पालकत्व’ स्वीकारणार असल्याचे सांगितले़ तसेच पूजाच्या शिक्षणासह कन्यादानापर्यंतचा येणारा सर्व खर्च स्वकमाईतून करण्याचा मानस त्यांनी ठेवला आहे़ या अनुषंगाने बुधवारी बुबनाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात बाजीराव पाटील यांनी पूजाचे पालकत्व स्वीकारले़ यावेळी सरपंच उल्फतबी मकानदार, त्रिशला निडगुंदे, स्नेहल मांजरे, रोशनबी बैरगदार, सतीश निडगुंदे, गौतम किनिंगे, मल्लाप्पा ऐनापुरे, ग्रामसेवक जमीर पटेल, अशोक राजमाने, विमल राजमाने उपस्थित होते़ दोन मुलींचे पालकत्व, शब्द पाळला...चंदगड पंचायत समितीचे निवृत्त कक्ष अधिकारी बाजीराव पाटील यांनी यापूर्वी तीन निराधार मुलांना आधार दिला आहे. गेल्या वर्षी आरोग्य शिबिर संपवून परतत असताना तिलारी घाटात अपघात झाला़ यात पाच कर्मचारी ठार झाले़ यातील कर्मचारी कविता देसाई यांनी अखेरचा श्वास घेताना माझ्या मुलीची काळजी घ्या, या शब्दासाठी बाजीराव पाटील यांनी त्याही मुलीचे पालकत्व स्वीकारले आहे़ आता अनाथ पूजा हिचे पालकत्व स्वीकारून शासकीय कर्मचाऱ्यांसमोर एक आदर्श ठेवला आहे़
'पूजा'ला मिळाले पालकत्व
By admin | Published: June 23, 2016 12:59 AM