प्रकाश पाटील
कोपार्डे : शालिनी पॅलेस ते जावळाचा गणपतीदरम्यान रस्त्याच्या दुतर्फा फूटपाथ आहेत खरे; मात्र,त्यांचा वापर पायी जाणारे कमी आणि विक्रेतेच जास्त करीत असल्याचे चित्र आहे. सध्या या फूटपाथची दुरवस्था झाली असून डी मार्टच्या बाजूने असणारे फूटपाथही कचरा व गवतामध्येच गायब झाले आहे. त्यामुळे शहराचे वैभव असणाऱ्या रंकाळा परिसरातील फूटपाथची दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे. पश्चिमेच्या बाजूने कोल्हापूर शहरात प्रवेश करताना कोल्हापूर-गगनबावडा रस्त्याच्या नवीन नाका रिंग रोडपासून ते रंकाळा तलावापर्यंत दुतर्फा फूटपाथ ठेवण्यात आले आहेत; पण शालिनी पॅलेसपासून ते रंकाळा तलाव चिल्ड्रन पार्कपर्यंत दुतर्फा अनेक ठिकाणी फूटपाथची दुरवस्था झाली आहे. जिथे ते चांगल्या स्थितीत आहेत तिथे किरकोळ विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. अनेकजण रस्त्यावरच गाड्या लावून या विक्रेत्यांकडून खरेदीसाठी गर्दी करीत असल्याने वाहतूक कोंडीची मोठी समस्याही निर्माण होत आहे. त्यामुळे या फूटपाथवरील अतिक्रमण हटवून त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
फूटपाथवरच कचरा
या फूटपाथवरील पेव्हिंग ब्लॉक उखडलेल्या आहेत. तर जे मॅनहोल आहेत त्यावर झाकण नसल्याने ते उघडेच आहेत. यामुळे दुर्घटना होण्याची भीती आहे. डी मार्टच्या बाजूने वॉटर फ्रंट इमारत ते डी मार्टपर्यंत फूटपाथ गायब आहेत. तेथून पुढे नाममात्र असलेल्या फूटपाथवर गवत वाढले आहे तर् बहुतांश वेळा फूटपाथवरच कचरा टाकला जात असल्याचे चित्र आहे.
फोटो०९ रंकाळा फूटपाथ
१) कोल्हापूर गगनबावडा रस्त्यावर रंकाळा तलावाच्या फूटपाथचे पेव्हिंग ब्लॉक नाहीत आणि मॅनहोल उघडे आहेत.
२) रंकाळा चौपाटीच्या बाजूने शालिनी पॅलेस ते चिल्ड्रन पार्कपर्यंत किरकोळ विक्रेत्यांनी कब्जा केला आहे.