लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : शाहूवाडी तालुक्यातील अनेक स्मशानशेडची देखभाल व दुरुस्ती ग्रामपंचायत वेळेवर करीत नसल्यामुळे स्मशानशेडना अवकळा प्राप्त झाली आहे. यामुळे मृतदेहाची हेळसांड होत असून पावसाळयात ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही गावात पावसाळ्यात ताडपत्री बांधून मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.
शाहूवाडी तालुक्याच्या निर्मितीपासून बहुतांश समशानभूमींची अवस्था ‘जैसे थे’आहे. पंचवीस टक्के गावात शासनाचा निधी खर्च करून स्मशानशेड बांधले आहेत. तर काही गावांतील ग्रामपंचायतींनी शासनाचा निधी कागदावर खर्च केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना नाहक त्रास होत आहे. तर अनेक गावात समशानशेडचा पत्ताच नाही. या गावात उघड्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात आहेत. ज्या गावात स्मशानशेड बांधले आहेत त्या जागा गायरान व खासगी मालकीच्या आहेत. या जागा नदीकाठाला आहेत. या स्मशानभूमीकडे जाणारे रस्ते, पायवाट खासगी मालकीच्या शेतातून जातात. पावसाळ्यात या वाटेने जाताना खूप अडचणी निर्माण होतात. काही स्मशानभूमी या घनदाट राई, काटेरी झुडपात आहेत. मृतदेहाबरोबर आलेल्या व्यक्तींना या काट्यातून मार्ग काढावा लागत आहे. त्याचप्रमाणे मृतदेहाचे सर्व विधी पार पडेपर्यंत इतरांना स्मशानभूमी शेजारीच ताटकळत उभे रहावे लागत आहे.
स्मशानशेडजवळ पाण्याची देखील व्यवस्था नसते. अशावेळी घराकडून पाणी न्यावे लागते. या सर्व अडचणी स्थानिक ग्रामस्थांना भेडसावत असतात. ग्रामपंचायत निवडणुकीत लाखो रुपये खर्च करणारे स्थानिक नेते स्मशान भूमीसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यास उदासीन असल्याचे स्पष्ट होत आहे.
फोटो
शाहूवाडी तालुक्यातील नदीकाठी असणाऱ्या निळे गावातील स्मशानशेडची अशी दुरवस्था झाली आहे.