शाहूवाडीपासून कोळगाव, टेकोली, पणूंद्रे हा सात कि.मी. लांबीचा रस्ता आहे. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम झाले होते. म्हालसवडे, पणूंद्रे, टेकोली, कोळगाव या गावासह आसपासच्या वाड्यावस्त्यावरील नागरिकांना शाहूवाडी या तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करण्यासाठी हा प्रमुख मार्ग आहे. तसेच याच रस्त्यावरून जाधववाडी, पाटेवाडी येथून होणारी बॉक्साईटची वाहतूकही मोठ्या प्रमाणात होत असते. सध्या या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडल्याने व बाजूपट्ट्या खचल्याने या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून राहत असल्याने काही ठिकाणी या रस्त्याला पाणंदीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या मार्गावरून प्रवास करताना दुचाकी तसेच चारचाकी वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक वेळा या रस्त्यावरील अपघाताना हे खड्डे कारणीभूत ठरत आहेत. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यावरील खड्डे भरून या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था फारच बिकट होऊन मार्ग प्रवासासाठी धोकादायक ठरू शकतो.
शाहूवाडी ते पणूंद्रे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:19 AM