कळंबा : दूरवरून शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांना राहण्याची माफक दरात सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधण्यात आले खरे, मात्र या वसतिगृहाची सध्या प्रचंड दुरवस्था झाली आहे. शौचालयातून मैला वाहून नेणाऱ्या पाईपलाईन फुटल्यामुळे मैला थेट गटारीत मिसळत आहे. पुढे हेच मैलामिश्रित दुर्गंधीयुक्त सांडपाणी सासणे कॉलनीतील रहिवासी भागातील गटारीतून पुढे जाते. त्यामुळे या मैलामिश्रीत पाण्याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
आयटीआयच्या विध्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या वसतिगृहाकडे विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याने वसतिगृह रिकामे पडले आहे. याची मोठी दुरवस्था झाली आहे. आजमितीला याचा वापर कळंबा कारागृहातील कोरोनाबाधित रुग्ण व अन्य आजारांचे रुग्ण यांच्या उपचारासाठी होत आहे. सध्या या वसतिगृहातील शौचालयाची मोठी दुरवस्था झाली आहे. याबाबत माजी नगरसेवक सतीश लोळगे यांनी पालिका व जेल प्रशासनाकडे तक्रार केली होती. मात्र, दोन्हींकडूनही प्रतिसाद न दिल्याने याची अवस्था ‘जैसे थे’ आहे. शौचालयातून वाहणाऱ्या मैलामिश्रीत पाण्यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका असून याप्रकरणी तातडीने कार्यवाही करा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
फोटो : १५ आयटीआय दुरावस्था
आयटीआयच्या वसतिगृहातील शौचालयाची दुरवस्था झाल्याने मैलामिश्रित सांडपाणी गटारीत मिसळत आहे. याचा त्रास सासणे कॉलनीतील नागरिकांना होत आहे.