राम मगदूम - गडहिंग्लजतब्बल तीन वर्षांच्या संघर्षानंतर हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राला पूर्णवेळ डॉक्टर मिळाला होता. मात्र, दोन महिन्यांपूर्वीच याठिकाणी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. जहीर शेख यांच्या अपघाती निधनामुळे हलकर्णी परिसरातील गोरगरीब रुग्ण पुन्हा वाऱ्यावर पडले. जनतेच्या मागणीमुळे माय-बाप सरकारने चांगला तरुण डॉक्टर दिला. मात्र, त्यालाही देवाने हिरावून नेले.हलकर्णी हे गडहिंग्लज तालुक्याच्या पूर्व भागातील २५ खेड्यांचे मध्यवर्ती केंद्र आहे. त्यामुळेच याठिकाणी शासनाने प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू केले. दिवसाकाठी येथे ५० ते ६० बाह्यरुग्ण उपचारासाठी येतात. मात्र, डॉ. अनिल आठवे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर तीन वर्षांपासून या केंद्राला पूर्णवेळ डॉक्टर न मिळाल्यामुळे हलकर्णी परिसरातील गरीब रुग्णांचे मोठे हाल होत होते.पंचायत समितीच्या मासिक बैठकीतही अनेकवेळा डॉक्टरच्या मागणीचा विषय गाजला. माजी उपसभापती अरुण देसाई व बाळेश नाईक हे ‘हलकर्णी’साठी डॉक्टर, औषध व सुविधांच्या प्रश्नांवरून सभागृहच डोक्यावर घेत. देसार्इंनी उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता. जिल्हा परिषदेसह शासनानेही ‘हलकर्णी’च्या जनतेची मागणी लक्षात घेऊन डॉ. शेख यांची पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. हलकर्णीच्या रुग्णालयातील ‘ओपीडी’ संपल्यानंतर दररोज दुपारी परिसरातील एका आरोग्य उपकेंद्रात जाऊन ते रुग्णांवर उपचार करीत. त्यामुळे बसर्गे, अरळगुंडी, खणदाळ, हिडदुगी, नरेवाडी, बुगडीकट्टी व तेरणी या उपकेंद्रांतील रुग्णांही सोय झाली होती.‘रुग्णकल्याण’ राहून गेले हलकर्णी परिसरातील आरोग्यविषयक प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी डॉ. शेख यांनी येत्या सोमवारी हलकर्णी येथे रुग्णकल्याण समितीची बैठक बोलावली होती. या बैठकीस संबंधित सर्व सदस्यांनी सूचना कराव्यात, अशी त्यांची अपेक्षा होती. शुक्रवारी सकाळीच त्यांनी फोनवरून बैठकीची आठवण करून दिली. मात्र, दैवाने त्यांनाच हिरावून नेल्यामुळे तरुण डॉक्टरच्या स्वप्नातील ‘रुग्णकल्याण’ राहून गेल्याची खंत हलकर्णी परिसरातील जनतेत आहे.
गरीब रुग्णांचा तारणहार गेला!
By admin | Published: August 08, 2015 12:46 AM