अनिल पाटील --मुरगूडजिल्ह्यातील अतिसंवेदनशील म्हणून ओळख असणाऱ्या मुरगूड शहराचा प्रथम नागरिक ठरविण्याचा अधिकार शहरातील मतदारांना बहाल केल्याने मतदारराजा खुशीत आहे. यामुळे तब्बल १५ वर्षांपूर्वी झालेल्या थेट नगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला उजाळा मिळत असून, सहा महिन्यांनंतर आलेल्या लढतीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार कोण असतील याबाबत नागरिकांतून जोरदार चर्चा असून, उमेदवारी जरी आरक्षणावरून ठरणार असली तरी प्रवीणसिंह पाटील, नामदेवराव मेंडके, राजेखान जमादार, सुखदेव येरुडकर, संजय भारमल यांच्या नावावर चर्चा होत आहे.थेट नगराध्यक्ष निवड पद्धत व दोन वॉर्डचा एक भाग करण्याच्या निर्णयामुळे शहरातील काही गटांचे कार्यकर्ते उत्साहात आहेत, तर काहींना हा निर्णय अन्यायकारक वाटत आहे. प्रमुख पाटील गट व मंडलिक गट मात्र या नवीन पद्धतीचा आपल्या गटास पूर्णपणे फायदा होईल, असा दावा करीत आहेत. ही पद्धत कोणाच्या पथ्यावर पडणार हे समजेलच; पण सध्या तरी प्रमुख गटांचे इच्छुक उमेदवार कागदपत्रे गोळा करण्याच्या तयारीला लागले आहेत. मुरगूड पालिकेच्या विद्यमान सभागृहाची मुदत डिसेंबर २0१६ ला संपत आहे. त्यामुळे नव्या सभागृहासाठी आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांत निवडणुका लागण्याचा अंदाज आहे. सध्या मात्र या सभागृहामध्ये रणजितसिंह पाटील व प्रवीणसिंह पाटील गटाचे दहा नगरसेवक असल्याने पालिकेवर पाटील गटाची एकहाती सत्ता आहे. मंडलिक गटाचे चार नगरसेवक असून, राष्ट्रवादीमधून निवडून आलेल्या राजेखान जमादार व अन्य दोन नगरसेवकांनी मंडलिक गटाला पाठिंबा दिल्याने विरोधी नगरसेवकांची संख्या सातवर गेली आहे.शहरातील गाव भागावर पाटील गटाची आजही ताकद असल्याने गटाचा तो बालेकिल्ला मानला जातो, तर बाजारपेठ परिसरामध्ये मंडलिक गटाचे वर्चस्व आहे. सध्या पाटील गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रच आहेत. भविष्यात ते असेच राहतील याची शक्यता जास्त आहे. या गटाला मुश्रीफांच्या सांगण्यावरून राजे गटाची ताकद ही मिळू शकते आणि जर सर्वसाधारण गटासाठी नगराध्यक्ष आरक्षित झाले, तर प्रवीणसिंह पाटील तगडे उमेदवार असल्याने सध्या पाटील गटात उत्साहाचे वातावरण आहे.२00१ साली थेट नगराध्यक्ष निवड२00१ साली थेट नगराध्यक्ष निवडीमध्ये मंडलिक गट व पाटील गट यांच्यात तुल्यबळ लढत झाली. प्रवीणसिंह पाटील यांनी दलितमित्र डी. डी. चौगले यांचा तब्बल ५५३ मतांनी पराभूत करीत नगराध्यक्ष पद मिळविले होते. तेच डी. डी. आता पाटील गटाकडे आहेत.गत निवडणुकीमध्ये पाटील गट व मुश्रीफ गटाने एकत्रित लढून मंडलिक गटाकडून सत्ता मिळवली होती. मंडलिक गटाला मुश्रीफांचे कट्टर कार्यकर्ते राजेखान जमादार यांची साथ मिळाल्याने आपणही पाटील-मुश्रीफ आघाडीस तुल्यबळ लढत देऊ शकतो, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. राजेखान जमादार नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत; पण मंडलिक गटामध्ये जुनेजाणते कार्यकर्ते असल्याने गटप्रमुख उमेदवारीबाबत कोणता निर्णय घेतात, यावरही लढतीचे चित्र अवलंबून आहे. एकंदरीतच नगराध्यक्ष जनतेतून निवडला जाणार आहे. यामुळे संपूर्ण शहरावर वचक असणारा उमेदवार यशस्वी होणार असल्याने इच्छुकांनी संपूर्ण शहरावर लक्ष केंद्रित केले आहे, तर अन्य उमेदवारांनी आपल्या प्रभागामध्ये शेजारील कोणता वॉर्ड मिसळतो याबाबतची माहिती मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जनताच शहराचा नगराध्यक्ष ठरविणार असल्याने या लढती रोमहर्षक होणार हे मात्र नक्की. निवडणुका सहा महिन्यांवर असल्या, तरी वारे मात्र आतापासूनच वाहू लागले आहेत.
थेट नगराध्यक्षपदासाठी मुरगूडला जोरदार तयारी--
By admin | Published: May 24, 2016 11:18 PM