कुंभोज : निकृष्ट रोपांच्या पुरवठ्यामुळे येथील १० एकरांवरील शेतातील जी ९ जातीच्या केळीचे घड अपेक्षितपणे मोठे न झाल्याने केळींना ग्राहक आणि दर मिळणार नसल्याने नुकसानीच्या भीतीने शेतकरी हबकला आहे. नुकसानग्रस्त सहा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबत तक्रार दिली असून, नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू झाली आहे.
कुंभोज येथे पन्नास एकरांवर केळी लागवडीचे क्षेत्र आहे. यांपैकी गेल्या वर्षी येथील स्थानिक डीलरकरवी जळगाव येथून खरेदी केलेली केळीची रोपे निकृष्ट दर्जाची असल्याने केळी पिकाची अपेक्षित वाढ न होता घडही मोठे झालेले नाहीत. केळीस बाजारात ग्राहक तसेच अपेक्षित दर मिळणार नसल्याची वस्तुस्थिती आहे. एकरी तीन लाख रुपयांचे मोठे नुकसान होणार असलेले केळी उत्पादक शेतकरी धास्तावला आहे. नुकसानग्रस्तांपैकी सहा शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, जळगाव येथील कंपनीचे प्रतिनिधी तसेच कृषी अधिकाऱ्यांनी केळीक्षेत्राची पाहणी केली आहे. काही शेतकरी मात्र तक्रारीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. कृषी विभागाने संबंधित कंपनीला नोटीस बजावली असल्याचे समजते.
चौकट-
केळ्यांचा उत्पादन खर्च एकरी तीन लाख रुपये झाला आहे. एकरी ४० टनांचे उत्पन्न घटून केवळ १० टन केळी हाती लागतील. सरासरी सहा लाख रुपये मिळणारे उत्पन्न यावेळी दीड लाखापर्यंत घटणार आहे. अपेक्षित नुकसानभरपाई मिळावी.
- बाबासो भरमनाथ चौगुले,
केळी उत्पादक शेतकरी, कुंभोज.
फोटो ओळी- कुंभोज (ता. हातकणंगले) येथील बाबासाहेब चौगुले यांच्या शेतातील संभाव्य नुकसानीचे केळी पीक