कोल्हापूर : प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत विमा योजनेला मार्चपासून सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी जाहीर केले आहे. या योजनेचा कालावधी ३० मार्चपर्यंच होता. मात्र तो १८० दिवसांसाठी वाढवण्यात आला आहे.
केंद्र शासनाकडून कोरोनाशी संबंधित रुग्णावर उपचार, तपासणी करणाऱ्या सर्व आरोग्य सेवा देणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत रुपये ५० लाख इतक्या रकमेचा विमा कवच दिला जातो. तरी आरोग्य सेवा देणाऱ्या सर्व संबंधितांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत सादर करण्यात येणाऱ्या विमा अर्जाचा प्रस्ताव संचालक, आरोग्य सेवा, (पुणे) यांच्याकडे सादर करावेत. यामध्ये खासगी रुग्णालयांचे कर्मचारी, सेवानिवृत्त, कंत्राटी, रोजंदारीवरील कर्मचारी, बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध केलेले कर्मचारी, आशा, अंगणवाडी कर्मचारी, शासकीय रुग्णालयातील कर्मचारी, कोविडसाठी ज्या रुग्णालयांची सेवा घेतली आहे तसेच खासगी रुग्णालय या उपचारासाठी नोंदणीकृत असल्यास डॉक्टर्स, नर्सेस व अन्य कर्मचाऱ्यांनादेखील हे विमा संरक्षण लागू आहे.
---