मुरगूड : मुरगूड शहरामध्ये गेल्या पाच वर्षांमध्ये सत्ताधारी मंडळी ३५ कोटी रुपये आणल्याचा कांगावा करत आहेत, हे धादांत खोटे आहे. जी विकासकामे झाली आहेत ती नगरसेवकांच्या टक्केवारी पद्धतीमुळे दर्जाहीन झाली. नगरसेवकांनी स्वत:चा विकास साधण्यासाठीच प्रयत्न केला. मुरगूडमधील घराणेशाही संपवण्यासाठी आणि भ्रष्टाचारमुक्त मुरगूड बनवण्यासाठी सेनेकडे सत्ता द्या, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांनी केले. मुरगूड पालिकेसाठी शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचार प्रारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयशिवराय एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष गजानन गंगापूर होते. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे, दूध साखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, उपसभापती भूषण पाटील, राजेखान जमादार उपस्थित होते. संजय घाटगे म्हणाले, मोठमोठ्या इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे, तर सामान्य नागरिकांकडे आर्थिक संपन्नता आली पाहिजे, गरजा कमी झाल्या पाहिजेत, सध्याचे आमदार हे मंडलिक यांच्यामुळेच झालेत.विजय देवणे, बाबासाहेब पाटील, रामभाऊ सासणे, उमेदवार हेमलता लोकरे, वीरेंद्र मंडलिक, राजेखान जमादार यांनी मनोगत व्यक्त केले. हमीदवाडाचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, माजी पं. स. सदस्य आर. डी. पाटील, बंडोपंत चौगले, आनंदा फराकटे, प्राचार्य जीवन साळोखे, पी. डी. मगदूम, किरण गवाणकर, शिवाजीराव चौगले, सुहास खराडे, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)राजहट्ट आणि बालहट्ट मुरगूड आणि कागल येथील मंडलिक-घाटगे गटाच्या युतीबाबत स्पष्टीकरण देताना प्रा. मंडलिक म्हणाले, कागलमध्ये विक्रमसिंह घाटगे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण समरजित घाटगे यांना मदत करणार आहोत. त्यांनी मुरगूडमध्ये काय करायचे हा त्यांचा प्रश्न आहे. युतीबाबत एक एक जागेचा निर्णय झाला होता, पण मुरगूडमध्ये जागा वाढवून मागण्याचा हट्ट घाटगे गटाने केल्यामुळे राजे समरजितांचे नाव न घेता हा राजहट्ट असून, राजहट्ट आणि बालहट्टापुढे काही बोलता येत नाही, अशी टीका त्यांनी केली..... तर निवडणुकीतून माघार !गेल्या अनेक दिवसांपासून तालुक्याचे आमदार आणि मुरगूडमधील सत्ताधारी मुरगूडसाठी उगीचच ३५ कोटींचा निधी आणला म्हणून डांगोरा पिटत आहेत. त्यांनी ३५ कोटींचा निधी आणल्याचे स्पष्टीकरण द्यावे, जर ते सत्य असले तर मी नगराध्यक्षपदाच्या आणि आमच्या गटाचे सर्व सतरा उमेदवार नगरसेवकपदाच्या उमेदवारीतून माघार घेतील, असे आव्हान नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेखान जमादार यांनी दिले.
मुरगूडमध्ये टक्केवारीमुळे दर्जाहीन कामे
By admin | Published: November 17, 2016 12:05 AM