इचलकरंजी : गेल्या चार महिन्यांपासून पॉपलीन कापड हे उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने विकले जात आहे. दररोज सुताचे दर वाढत आहेत. कापडाला मागणी नाही. त्यामुळे पॉपलीन यंत्रमागधारकांनी पुकारलेला बंद वाढविला आहे. याबाबतचा निर्णय इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या बैठकीत घेण्यात आला. पॉपलीन यंत्रमाग २५ जूनपासून बंद असून, यात पुन्हा ९ जुलैपर्यंत वाढ केली आहे.
शहरातील जवळपास ८ ते १० हजार यंत्रमाग बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे दररोज अंदाजे १५ लाख मीटरप्रमाणे साधारण ९० लाख मीटर कापडाचे उत्पादन ठप्प झाले आहे. कोरोना महामारीमुळे आधीच मेटाकुटीला आलेला पॉपलीन यंत्रमाग या मंदीमुळे आणखीनच आर्थिक अरिष्टात सापडला आहे. काही प्रमाणात उत्पादन सुरू राहिल्यास कामगारांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटणार होता. मात्र, पूर्ण बंदमुळे कामगारांना काम मिळणार नाही. तसेच कारखानदारांनाही भाडे, वीज बिल, कारखाने बंद राहिल्याने पुन्हा सुरू करताना येणारा खर्च हा अतिरिक्त भार पडणार आहे. परंतु, उत्पादन घेऊनही खर्च परवडत नसल्याने अखेर आणखी काही दिवस कारखाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. पॉपलीन यंत्रमागधारकांनी या बंदला चांगला प्रतिसाद दिला आहे. यानंतर गुरुवारी (दि. ८) बैठक घेण्याचे ठरविले आहे. यावेळी कैश बागवान, श्रीशैल कित्तुरे, अशोक घट्टे, दिलीप ढोकळे, नंदकुमार कांबळे, तुकाराम साळुंखे, जयवंत अचलकर, आनंदा होगाडे, फिरोज जमखाणे, गजानन मेटे, आयुब गजबरवाडी, सचिन सावंत, राजू राशिनकर यांच्यासह कारखानदार उपस्थित होते.
फोटो ओळी
०१०७२०२१-आयसीएच-०५
इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनच्या बैठकीत पॉपलीन कारखाने ९ जुलैपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.