बातमी संडे स्पेशल किंवा संडे ँकरसाठी वापरता येती का पाहावी.
सरदार चौगुले, लोकमत न्यूज नेटवर्क, पोर्ले तर्फ ठाणे : ‘गाव करी ते राव काय करी’ या म्हणीप्रमाणे पन्हाळा तालुक्यातील पोर्ले तर्फ ठाणे गावाने सामुदायिक उठावातून अनेक सामाजिक उपक्रम राबवून ते यशस्वी केले आहेत. वेळेत उपचार न मिळाल्याने गावातील अनेकांना प्राण गमवावे लागले. अशा अनेक कटू प्रसंगांतून पोर्लेकरांनी बोध घेत लोकवर्गणीतून रुग्णवाहिका आणली. जनसेवेसारख्या सामाजिक उपक्रमाचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते केला.
कोरोनाकाळात पोर्ले गावातील अनेक रुग्णांना वेळेत उपचार न मिळाल्याने जीव गमवावा लागला. हे पाहत लोकवर्गणीतून रुग्णवाहिका खरेदी करून वेळेत उपचाराअभावी होणारी परवड कुठे तरी थांबला पाहिजे. या भूमिकेतून पैसे गोळा करायला सुरुवात केली आणि महिन्यात आठ लाख ३० हजार रुपये जमा झाले. एका महिन्यात पोर्ले गावात सर्वसोयींनी युक्त रुग्णवाहिका मिळाली.
गावाने रुग्णवाहिकेचा भार उचलला असला तरी रुग्णवाहिकेचा चालक आणि इतर खर्च ग्रामपंचायत स्वनिधीतून करणार असल्याचे बोलले जात आहे. अगदी सवलतीच्या दरात रुग्णवाहिका रुग्णांच्या सेवेसाठी वापरली जाणार आहे. तसेच गावाव्यतिरिक्त अन्य कोठे? रुग्णवाहिकेचा आवश्यकतेनुसार वापर केला जाणार आहे. शिवाय परिसरात १०८ च्या रुग्णवाहिकेला पर्यायी रुग्णवाहिका आल्याने तिच्यावरचा भार थोडा हलका होणार आहे.
चौकट
जनसेवेसाठी दानपेटीची गरज लोकवर्गणीच्या संकल्पनेतून रुग्णवाहिकेचा हेतू सफल झाला असला तरी नाममात्र फीमधून रुग्णवाहिकेच्या प्रवास, देखभाल आणि चालक पगार खर्च भागविणे ग्रामपंचायतीसाठी तारेवरची कसरत असणार आहे. एखादी संकल्पना राबविणे जेवढी गरजेचे आहे तेवढी त्यांच्याबाबत दूरदृष्टी असणेही महत्त्वाचे आहे. लोकवर्गणीतून रुग्णवाहिका आली असली तरी तिच्या वापरासाठी येणारा खर्च हा दानपेटीच्या माध्यमातून करणे जरुरीचे आहे.