लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : वनविभागाच्या अनाठायी विरोधाला व तांत्रिक मुद्द्यांना कायद्यातील व दाव्यातील मुद्दे पटवून देत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी वनहक्क अपिलांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय देत त्यांना दिलासा दिला. गुुरुवारी झालेल्या जिल्हास्तरीय वनहक्क संरक्षण समितीच्या बैठकीत १८४ अपिलांवर सविस्तर चर्चा होऊन या वनात राहणाऱ्या सर्वसामान्यांच्या बाजूने चर्चा होऊन बहुतांशी प्रकरणे निकाली काढण्यात आली.
जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस उपवनसंरक्षक आर. आर. काळे, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा समन्वयक डी. के. शिंदे, महसूल सहाय्यक स्नेहल जाधव उपस्थित होत्या.
यावेळी पूर्वीच्या १४९ व नव्याने दाखल झालेल्या ३५ अपिलांवर संबंधित वनहक्क दावेदार व अभिवक्त्यांचे युक्तिवाद झाले. तांत्रिक कारणांमुळे बऱ्याच प्रकरणांत उपवनसंरक्षक यांचा नकारार्थी अभिप्राय असल्याने तेथील स्थानिक नागरिकांना जमिनीचा मालकी हक्क मिळत नव्हता. त्यात पन्हाळा, चंदगड, भुदरगड, करवीर, शाहूवाडी, आजरा आणि गडहिंग्लज येथील वनक्षेत्रांचा समावेश होता. अशा १८४ दाव्यांवर गुरुवारी चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व दावेदारांचे म्हणणे ऐकून घेतले, जी अपिले केवळ तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित होती ती त्यांनी निकाली काढली. ॲड व्ही. आर. पाटील, सासवडे, ॲड. सुरेश कदम यांनी अशिलांची बाजू मांडली.
---