कोल्हापूर : महानगरपालिका कर्मचाऱ्यांना सातव्या आयोगानुसार वेतन देण्याच्या मागणीवर मंगळवारी महानगरपालिका कर्मचारी संघ व पालिका प्रशासन यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. यासंदर्भात उद्या, गुरुवारी पुन्हा एकत्र चर्चा होऊन निर्णय घेतला जाणार आहे.
पालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सर्व कायम कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे, तसेच देय असलेले गणवेश देण्यात यावेत, अशी मागणी कर्मचारी संघाने प्रशासनाकडे केली असून, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शुक्रवारपासून (दि. १ जानेवारी) बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी कर्मचारी संघाच्या प्रतिनिधींसोबत प्रशासनाची चर्चा झाली.
या चर्चेत प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त निखिल मोरे, सहायक आयुक्त विनायक औंधकर, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, आस्थापना अधीक्षक सागर कांबळे, तर कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चरापले, कार्याध्यक्ष विजय वणकुद्रे, जनरल सेक्रेटरी अजित तिवले, अनिल साळोखे, सिकंदर सानुले यांनी भाग घेतला.
प्रशासक बलकवडे यांनी शासनाने घातलेल्या अटी व शर्ती यांची माहिती दिली. जीआयएस सर्वेक्षण करणे, चालू मागणीच्या नव्वद टक्के वसुली करणे, जुन्या थकबाकीच्या पन्नास टक्के वसुली करणे या अटी पूर्ण करणे अनिवार्य असल्याचे बलकवडे यांनी सांगितले. तसेच ही जबाबदारी प्रशासनाची असून त्यासंदर्भात प्रशासनानेच नियोजन करायचे असून आम्ही कर्मचाऱ्यांनी त्याप्रमाणे काम करायचे असल्याचे संजय भोसले यांनी स्पष्ट केले. आम्ही विभागीय कार्यालयनिहाय जादा कर्मचारी लावून तसेच राेज जास्तीचे दोन दोन तास काम करून वसुलीसाठी प्रयत्न करू शकतो, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
उद्या पुन्हा बैठक...
प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हे काम करायचे आहे, याकडे युनियनने लक्ष वेधले. उद्या, गुरुवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत काय तो निरोप द्या, अन्यथा शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाऊ, असा इशारा युनियनने दिला. आता गुरुवारी पुन्हा बैठक होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.