विश्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्च व सर्वोच्च न्यायालयातील नामांकित विधिज्ञ अभय नेवगी यांनी दिवंगत आईची आठवण म्हणून येथील बालकल्याण संकुलाच्या महिलांच्या वसतिगृहासाठी तब्बल ५० लाख रुपयांची देणगी देण्याचा निर्णय घेतला आहे. संकुलाच्या ७४ व्या वर्धापनदिन सोहळ्यात शनिवारी देणगीचा धनादेश ते संस्थेकडे सुपूर्द करणार आहेत. ॲड. नेवगी यांच्या वडिलांपासून त्यांचे या संस्थेशी वेगळे नाते आहे. या संस्थेला काही मदत हवी आहे असे नुसते समजल्यावर मदतीसाठी धावून येण्याची परंपरा त्यांनी या वेळेलाही जपली. ॲड. नेवगी हे देशात गाजलेल्या डॉ. नरेंद्र दाभोलकर व ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे खून खटल्यातील या दोन्ही कुटुंबीयांचे वकील आहेत. या दोन्ही केसेसही ते बांधीलकी म्हणून लढवत आहेत.
बालकल्याण संकुल शासनाकडून कावळा नाका परिसरात मिळालेल्या दहा गुंठे जागेत महिलांचे वसतिगृह बांधत आहे. त्यासाठी अडीच कोटींचा खर्च आहे. आतापर्यंत सव्वा कोटी रुपयांचे बांधकाम झाले आहे.तेवढीच रक्कम समाजातून देणगीच्या रूपाने उपलब्ध झाली आहे. अजूनही सव्वा कोटी रुपयांची गरज असल्याचे समजताच नेवगी यांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. शनिवारी दुपारी ४.३० वाजता संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पुढारीचे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या उपस्थितीत हा समारंभ होत आहे. यावेळी देणगीदार मान्यवरांचा सत्कार व दहावी-बारावीत यश मिळवलेल्या संस्थेतील मुलांचा गौरव असा कार्यक्रम होणार आहे.
नेवगी यांचे वडील एस.व्ही. नेवगी हे जिल्हा न्यायाधीश होते. तेव्हापासून त्यांचे या संस्थेशी ऋणानुबंध आहेत. अभय नेवगी वकील झाल्यावर त्यांनी पहिली केस बालकल्याण संकुलाचीच लढवली होती. त्यावेळी संस्थेने त्यांना दिलेली ५०० रुपये वकील फीही त्यांनी संस्थेलाच मदत म्हणून परत केली. तीन दशकांहून अधिक काळ ते संस्थेचा आधार बनून आहेत. त्यांच्या पत्नी कैलाश नेवगी या देखील एक रुपयाही शुल्क न घेता अनेक वर्षे संस्थेच्या दत्तक प्रक्रियेच्या सर्व केसेस चालवत होत्या. एखादे कुटुंब समाजाची किती निरपेक्ष भावनेने सेवा करते याचे नेवगी हे अत्यंत दुर्मीळ उदाहरण आहे. सगळाच अंधार नाही..समाजात अशा काही चांगल्या पणत्याही उजेड पेरत आहेत.
चार कोटींची मालमत्ता..
ॲड. नेवगी यांची येथील जवाहरनगरात आजच्या बाजारभावाने किमान ४ कोटींची किंमत होईल अशी मालमत्ता होती. रोटरी मूकबधिर शाळेला जागा नाही असे समजल्यावर त्यांनी ही मालमत्ता त्या शाळेला दिली. त्याच्या कागदपत्रांचाही खर्चही त्यांनीच केला.
अनाथांचा आधार..
राज्यभरातील अनाथाश्रमातून बाहेर पडलेल्या मुलांच्या उच्च न्यायालयातील केसेसही ॲड. नेवगीच लढवतात. काही दिवसांपूर्वी माझगाव डॉकमध्ये काम करणाऱ्या परुळेकर नावाच्या तरुणाच्या वडिलांचे नाव कुठेच रेकॉर्डवर नव्हते. त्यामुळे त्याची पदोन्नती थांबली. हे प्रकरण उच्च न्यायालयात दाखल करून त्याला अनाथ म्हणून न्यायालयाने जाहीर केले व त्याच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा झाला. बालकल्याण संस्थेच्या सर्व केसीस आपलं ते घरचं काम आहे या भावनेने अनेक वर्षे ऍड नेवगी लढवत आले आहेत..