कोल्हापूर : गेल्या नऊ वर्षांपासून महापालिकेमध्ये सत्तेवर असणाऱ्या काँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये उपमहापौरपदावरून कमालीची धूसफूस सुरू झाली आहे. राष्ट्रवादीच्या वाट्याला असलेल्या या पदावर काँग्रेसने कब्जा केला आहे; त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. या पदावरून आघाडीत बिघाडीची शक्यता वर्तविली जात आहे.
कोल्हापूर महापालिकेच्या पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्यासाठी केवळ आठ महिन्यांचा अवधी बाकी आहे. यामुळे काँगे्रस-राष्ट्रवादीबरोबरच विरोधी भाजप-ताराराणी आघाडीमध्येही पदासाठी चढाओढ सुरू आहे. काँगे्रसमध्ये महापौरपदासाठी पाच सदस्य इच्छुक आहेत; तर राष्ट्रवादीतून स्थायी समिती सभापतिपदासाठी तीन सदस्यांमध्ये चुरस आहे. उपमहापौरपदासाठी तीन सदस्यांमध्ये चढाओढ आहे. भाजपमध्येही विरोधी पक्षनेते, गटनेतेसाठी इच्छुकांमध्ये घालमेल सुरू होती. यापूर्वी उपमहापौरपदासाठी फारसे कोणीही इच्छक नव्हते. गेल्या पाच वर्षांत मात्र, या पदासाठीही चुरस आहे.
- उपमहापौरपद बनला कळीचा मुद्दा
आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार पुढील स्थायी समितीचे सभापती, उपमहापौरपद राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. मात्र, काँगे्रसमध्ये इच्छुकांची संख्या जास्त असल्याने या पदावर काँगे्रसने दावा केला असून, विद्यमान उपमहापौर संजय मोहिते यांनीही पदाचा राजीनामा दिलेला नाही. राष्ट्रवादीतूनही या पदासाठी इच्छुक आहेत. पद मिळाले नाही तर वेगळी भूमिका घेण्याचा त्यांनी पवित्रा घेतला आहे. त्यामुळे नेते कोणता निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
- महापौर निवडीत पडसाद उमटण्याची शक्यता
राष्ट्रवादीतून अजित राऊत या पदासाठी इच्छुक आहेत. सेवाज्येष्ठतेनुसार जर उपमहापौरपद मिळणार नसेल तर त्यांनी स्थायी समितीचे सभापतिपद देण्याची मागणी केली आहे. स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी अगोदरच संदीप कवाळे, सचिन पाटील इच्छुक आहेत. उपमहापौरपदावरून शेवटच्या टप्प्यात आघाडीत फूट होण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. काँगे्रसने हे पद दिले नाही तर महापौर निवडीवेळी राष्ट्रवादीतील एक गट वेगळा विचार करण्याच्या तयारीत असल्याचीही चर्चा आहे.