शिरोली : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून संचार बंदीच्या काळात उद्योग धंदे सुरू ठेवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अजिंक्यतारा येथे पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांच्याकडे विनंती केली होती; पण शासन निर्देशानुसार आणि कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्ह्यातील सर्व उद्योगधंदे राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम व अटीनुसार सुरू ठेवावे लागतील.
यामध्ये संबंधित कंपनीने कामगारांना कंपनीतच ठेवावे, किंवा इतर कुठे ही एकत्रित ठेवावे.कामगारांना ये-जा करता येणार नाही. अन्यथा बंद ठेवावेत, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. त्यामुळे १५ ते ३० एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील सर्वच उद्योगधंदे बंद राहण्याची शक्यता आहे.
मुंबई, पुणे या मोठ्या मेट्रो शहरानंतर कोल्हापूर येथील ऑटोमोबाइल उद्योग हे जगभरात प्रसिद्ध आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव, कागल, या मोठ्या औद्योगिक वसाहतीबरोबरच कोल्हापूर शहरातील वाय. पी. पोवार नगर, उद्यमनगर याठिकाणी लहान लहान उद्योग आहेत, तसेच हातकणंगले, इचलकरंजी, कुशिरे, गडहिंग्लज याठिकाणीसुद्धा उद्योग विस्तार झालेला आहे. जिल्ह्यात लहान-मोठे सुमारे पाच हजारांहून अधिक उद्योग आहेत, तर या उद्योगावर अवलंबून असलेले सुमारे एक लाखापेक्षा जास्त कामगार आहेत.
परप्रांतीय मंजुरांची संख्या २० हजार पेक्षा जास्त आहे. त्यामुळे उद्योग बंद राहिल्यानंतर या सर्वांना फटका बसणार आहे. यावेळी स्मॅक अध्यक्ष अतुल पाटील,राजू पाटील,मॅक अध्यक्ष गोरख माळी, दिनेश बुधले यांच्यासह उद्योजक उपस्थित होते. अत्यावश्यक सेवेतील औषध तयार करणाऱ्या कंपन्या, शेती औजारे तयार करणारे उद्योग, कोरोगेटेड इंडस्ट्रीज सुरू राहणार आहेत.
शासनाने जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्राकानुसार नियम व अटी मान्य करून ज्यांना शक्य असेल त्यांनी उद्योग सुरू ठेवावेत.
-अतुल पाटील-अध्यक्ष स्मॅक
कामगार रस्त्यावरून येणार-जाणार नाहीत. जे कामगारांना कंपनीतच ठेवतील त्यांचेच उद्योग सुरू राहणार आहेत.
-श्रीकांत पोतनीस -अध्यक्ष गोशिमा