कोल्हापूर : मुळात कोल्हापूर येथील राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अनेक पदे भरलेली नसताना आता राज्यात होणाऱ्या नव्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी येथील मनुष्यबळ हलविले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सिंधुदुर्ग, सातारा आणि अलिबाग येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसाठी जे अध्यापक जाऊ इच्छितात त्यांची नावे कळविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक यांनी शुक्रवारी झालेल्या व्हिडिओ काॅन्फरन्समध्ये याबाबत सूचना दिल्या आहेत. वरील ठिकाणी नवी महाविद्यालये सुरू होत असून, या ठिकाणी तातडीने सर्व प्रकारच्या प्रक्रिया सुरू करण्यासाठी शासनाने कंबर कसली आहे. याचाच एक भाग म्हणून येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील जे प्राध्यापक या तीन ठिकाणी प्राध्यापक म्हणून जाऊ इच्छितात त्यांची नावे मागविण्यात आली आहेत. जर यातील काहींनी होकार कळविला तर निश्चितच सीपीआरमध्ये डॉक्टर आणि प्राध्यापकांची कमतरता भासणार आहे.
चौकट
परिचारिकाची संख्या कमी होण्याची शक्यता
सध्या सीपीआरमध्ये जेवढ्या परिचारिका आहेत. यातील ३५ टक्क्यांहून अधिक परिचारिका या कोकणातील आहेत. त्यांनाही जर सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जाण्याबाबत विचारले आणि त्यांनी तयारी दर्शविली तर यातील बहुतांशी परिचारिका कोकणात जाऊ शकतात. त्यामुळे जर येथील मनुष्यबळ कमी होणार असेल तर त्याची पर्यायी व्यवस्थाही शासनाला करावी लागेल.