लाेकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकूळ) दूध विक्री दरात वाढ करण्याची शक्यता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने ‘अमूल’ने प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे ‘गोकूळ’मध्येही दरवाढीसाठी हालचाली गतिमान झाल्या असून उद्या, शुक्रवारी यावर संचालक मंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
पेट्रोेल, डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. रोज पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने सगळ्या घटकांवर परिणाम झाला आहे. त्यामुळे दूध वाहतुकीसह इतर खर्चातही वाढ झाल्याने ‘अमूल’ दूध संघाने आज, गुरुवारपासून विक्री दरात प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ‘गोकूळ’मध्ये दरवाढीबाबत हालचाली गतिमान झाल्या आहेत. ‘अमूल’च्या धर्तीवर प्रतिलिटर दोन रुपयांची वाढ करण्यासाठी चर्चा सुरू असून यासाठी उद्या, शुक्रवारी ‘गोकूळ’च्या संचालकांची बैठक हाेत असून यामध्ये दरवाढीवर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे.
सध्या, पुणे व मुंबईत ‘गोकूळ’चे म्हैस दूध प्रतिलटर ५८ तर गाय ४७ रुपये लिटरने विक्री होत आहे.
उत्पादकांना दोन रुपये देण्याची संधी
‘गोकूळ’च्या सत्ताधारी मंडळींनी निवडणुकीत उत्पादकांना दोन रुपये जादा दर देण्याचे अभिवचन दिले होते. दूध विक्री दरात वाढ करून ते उत्पादकांना देता येऊ शकते, त्यामुळे नेत्यांसह संचालक दरवाढीवर गांभीर्याने विचार करत आहेत.
‘गोकूळ’चे सध्याचे दर प्रतिलिटर -
शहर म्हैस दर गाय दर
मुंबई, पुणे ५८ रुपये ४७ रुपये
कोट-
पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे. ‘गोकूळ’च्या दूध विक्री दरातील वाढीबाबत शुक्रवारी संचालक मंडळाची बैठक बोलावली आहे.
- अरुण डोंगळे (ज्येष्ठ संचालक, गोकूळ)