लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘ज्याचा माल त्याचा हमाल’ यावरून माल वाहतूकदार व व्यापारी यांच्यामध्ये पेच निर्माण झाला आहे, याबाबत रविवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी बैठक घेतली. हमालीचा विषय हा शासनाच्या पातळीवरील आहे, राज्याचा धोरणात्मक निर्णय असल्याने महिन्याचा अवधी द्या, असे पाटील यांनी सांगितले. यावर आज, सोमवारच्या पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूकदारांची बैठक बोलवून यामध्ये निर्णय घेऊ, असे लॉरी ऑपरेटर्स असाेसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
गेली आठ-दहा दिवस हमालीवरून वाहतुकीचा गुंता वाढला आहे. याबाबत पालकमंत्री पाटील यांनी अजिंक्यतारा येथे बैठक घेतली. यामध्ये साखर वाहतूक व हमालीचा विषय राज्यस्तरीय आहे. यासाठी सहकारमंत्री, साखर आयुक्त, साखर महासंघ, कामगार विभाग यांच्याशी चर्चा करावी लागेल. महिन्याचा अवधी द्या, संबंधित घटकांशी चर्चा करून विषय मार्गी लावू, मात्र वाहतूक सुरू करा, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. यावर वाहतूकदारांनी काहीसी अनुमती दर्शवली, मात्र पुणे, सोलापूर, सातारा, सांगली जिल्ह्यातील साखर वाहतूकदार आहेत, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय निर्णय घेता येणार नसल्याचे लॉरी ऑपरेटर्स असाेसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी सांगितले. यावर आज, सोमवारी दुपारी बारा वाजता पाच जिल्ह्यातील साखर वाहतूकदारांसमवेत बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार चंद्रकांत जाधव, गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे, बाळू गाेगवे, विजय भोसले, युवराज माने, युवराज पाटील, अभय खाडे, गोविंद पाटील आदी उपस्थित होते.
कांदा-बटाटा वाहतुकीस नकार
कांदा-बटाटा वाहतुकीबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांनी बैठक घेतली, पण त्यांनी व्यापाऱ्यांची बाजू घेतल्याचे सुभाष जाधव यांनी सांगितले. त्यामुळे एकवेळ साखर वाहतुकीचा विषय मार्गी लागेल, मात्र कांदा-बटाट्याची नाही, असे त्यांनी सांगितले.