संदीप खवळे - कोल्हापूरआरटीओ कार्यालय वाहनचालक परवाना, वाहन नोंदणी कर प्रमाणपत्र टपाल खात्याच्या स्पीड पोस्टातर्फे वाहनधारकांना पाठविते. मात्र, या दोन्ही विभागांच्या गलथान कारभारामुळे प्रमाणपत्र, परवाना, ना पोस्टात मिळतो, ना आरटीओ कार्यालयात़ स्थानिक पोस्ट प्रधान पोस्ट कार्यालयाचा रस्ता दाखविते आणि प्रधान कार्यालय आरटीओकडे पाठविते़ तर आरटीओ कार्यालय पुन्हा प्रधान पोस्ट कार्यालयाकडे जाण्यासाठी सुचविते़ पोस्ट आणि आरटीओच्या या गोंधळात वाहनधारकांची ससेहोलपट होत आहे़ आरटीओ आणि कोल्हापूर विभागाच्या प्रधान पोस्ट कार्यालय यांच्यात झालेल्या करारानुसार २ सप्टेंबर २०११ पासून वाहन परवाना आणि वाहन नोंदणी कर प्रमाणपत्र टपाल खात्याच्या स्पीड पोस्टातर्फे पाठविण्यात येते. जूनअखेरीस आरटीओकडून स्पीड पोस्टातर्फे तीन लाख ९२ हजार ३०२ वाहन परवाने वितरित करण्यात आले आहेत. याच कालावधीमध्ये सात हजार ६८६ वाहन चालक परवाने, तर ९० हजार ९५ वाहन नोंदणी कर प्रमाणपत्रे परत आलेली आहेत. स्थानिक पोस्टातून परत आलेले वाहन परवाने आणि वाहन कर नोंदणी प्रमाणपत्रे वाहनधारकांना देण्यासाठी पोस्टाच्या प्रधान कार्यालयात कक्षाचे उद्घाटनही दहा दिवसांपूर्वी करण्यात आले़ या कक्षात ही कागदपत्रे १५ दिवस ठेवण्यात येतात़ यानंतर ती आरटीओ कार्यालयात जातात़ परंतु, या दोन्ही ठिकाणी वाहनधारकांना कागदपत्रे आजही मिळत नसल्याचे चित्र आहे़ काही वाहनधारकांना पोस्टातून पाठविली गेलेली परवाना आणि वाहन नोंदणी कर प्रमाणपत्रे वर्ष झाले तरी मिळालेली नाहीत़ प्रधान पोस्ट कार्यालयाशी संपर्क कराप्रधान पोस्ट कार्यालयाचे प्रवर अधीक्षक आर. पी़ पाटील म्हणाले, वाहनधारकांना न मिळालेली वाहन परवाना आणि वाहन नोंदणी कर प्रमाणपत्रे स्थानिक पोस्टाकडून प्रधान पोस्ट कार्यालयात येतात़ पोस्टाच्या आरटीओ कक्षामध्ये ही कागदपत्रे १५ दिवस राहतात़ यानंतर ही कागदपत्रे आरटीओ कार्यालयात जमा केली जातात़ स्थानिक पोस्टाकडून कागदपत्रे मिळाली नसतील आणि त्यांचा शोध लागत नसेल, अशा वाहनधारकांनी प्रधान पोस्ट कार्यालयाशी संपर्क साधावा.
१६ एप्रिल २०१५ रोजी नूतनीकरण करून घेतले होते; पण अद्यापही नूतनीकरण परवाना मिळालेला नाही़ प्रधान पोस्ट कार्यालय, स्थानिक पोस्ट आणि आरटीओ कार्यालय या तिन्ही ठिकाणी चौकशी केली़ तरीही परवाना मिळालेला नाही़ स्पीड पोस्टाच्या ईएमआय क्रमांकावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला असता सापडत नाही. - हरीश बिडकर, इचलकरंजी.२४ डिसेंबर २०१४ रोजी माझे स्मार्ट कार्ड प्रधान पोस्ट कार्यालयातून पाठविले होते़ परंतु, अद्यापही ते मिळालेले नाही़ याबाबत आरटीओ कार्यालयात चौकशी केली असता, त्यांनी प्रधान पोस्टात चौकशी करण्यास सांगितले़ पूर्वीची हँड डिलिव्हरी पद्धतच योग्य होती. - अभिजित दळवी, मंगळवार पेठ