कोल्हापूर : बाजार समितीचे संचालक नंदकुमार वळंजू यांचे संचालकपद धोक्यात आले आहे. समितीच्या नुकसानीबद्दल त्यांच्यासह २२ जणांवर २२ लाख ८७ हजारांची जबाबदारी निश्चित केल्याने पणन कायदा ‘कलम १७’ नुसार त्यांच्या पदावर गंडांतर येऊ शकते. समितीने पद रद्द करण्याची शिफारस पणन संचालकांकडे करण्याचे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी दिले आहेत. बाजार समितीचे आर्थिक नुकसान केल्याबद्दल चौकशी अधिकाऱ्यांनी १८ माजी संचालक व चार सचिवांवर २२ लाख ८७ हजार ३६१ रुपयांच्या जबाबदारी निश्चिती केली आहे. या विरोधात माजी संचालकांनी पणन संचालकांकडे दाद मागितली होती, पण संचालकांनी ती फेटाळून लावली. त्यानंतर समितीने वसुलीच्या नोटिसा पाठविल्या, पण त्याला दाद न दिल्याने महसुली कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. माजी संचालकांच्या गावातील तलाठ्यांना पत्रे पाठवून त्यांच्या मालमत्तेच्या कागदपत्रांची मागणी केली आहे. तोपर्यंत वारणा-कोडोली येथील पांडुरंग शामराव पाटील यांनी नंदकुमार वळंजू यांच्याबाबत जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केली आहे. त्या तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधकांनी समितीला नोटीस काढली असून वळंूज यांचे पद रद्द करण्याबाबत वरिष्ठांकडे शिफारस करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समितीच्या संचालक मंडळाची गुरुवारी (दि. २८) बैठक आहे, या सभेच्या अजेंठ्यावर नंदकुमार वळंजू यांचे संचालकपद रद्द करण्याबाबत विषय ठेवला आहे. या शिफारसीबाबत संचालक मंडळातच दोन गट पडल्याची चर्चा सुरू आहे. फेरचौकशी कधी?समितीच्या चौकशीत काही मुद्दे अपुरे असल्याचे निदर्शनास आल्यानंतर जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे यांनी दि. २८ डिसेंबर २०१५ ला फेरचौकशीचे आदेश दिले होते; पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामध्ये रोजंदारी कर्मचाऱ्यांचा पगार व न्यायालयीन खर्च, प्लॉट हस्तांतरणातील तफावत आदी मुद्दे तपासले जाणार आहेत. तक्रारदार असूनही अडचणीतवळंूज यांच्या तक्रारीवरूनच माजी संचालकांच्या कारभाराची चौकशी होऊन कारवाई झाली. जरी पद रद्दची कारवाई झाली तरी त्यांच्याबद्दल पणन संचालक सहानुभूती दाखवू शकतात; पण २२ लाख जबाबदारी निश्चितीमध्ये पेट्रोल पंप जागा भाडेतत्त्वावर दिल्याने १८ लाख नुकसान झाल्याचा ठपका आहे. यामध्ये वळंजू यांनी कोणत्याच प्रकारचा विरोध केला नसल्याचे चौकशी अहवालात दिसते. त्यामुळे तक्रारदार असूनही ते अडचणीत येऊ शकतात.
वळंजू यांचे ‘बाजार’चे पद धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2016 11:40 PM