कोल्हापूर : टपाल स्वीकारण्याच्या वेळेत १ तास ३० मिनिटांनी वाढ करण्याच्या डाक कार्यालयाच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे ही सुविधा शुक्रवारपासून आता आणखी १८ कार्यालयांमध्ये सुरू झाली. तसेच उशिरा स्वीकारलेले टपाल जलद गतीने गोळा करणे व ते रेल्वे डाक सेवेकडे पाठविणे अधिक वेगाने व्हावे म्हणून विशेष रिक्षाही सुरू करण्यात आली आहे.
कोल्हापुरातील मुख्य पोस्ट कार्यालयात आयोजित कार्यक्रमात गोवा क्षेत्राचे पोस्टमास्तर जनरलडॉ. एन. विनोदकुमार यांच्या हस्ते व प्रवर अधीक्षक आय. डी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी सकाळी या सेवेचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन झाले.
ग्राहकांच्या सोईसाठी टपाल स्वीकारण्याच्या वेळेत वाढ करण्याचा उपक्रम कोल्हापूर डाक विभागाने राबविला. त्यासाठी जिल्ह्यातील १४ प्रमुख पोस्ट कार्यालये निवडण्यात आली. २० आॅगस्ट ते १४ नोव्हेंबर या कालावधीत या १४ कार्यालयांतून नऊ हजार ५३८ रजिस्टर टपाल, आठ हजार ४३२ स्पीड पोस्ट, ६२१ पार्सल याचे संकलन वाढीव वेळेत करण्यात आले.सध्या कार्यरत १४ कार्यालयेकोल्हापूर प्रधान डाकघर, जयसिंगपूर, कागल, शाहूपुरी, गूळ मार्केट यार्ड, इचलकरंजी, शनिवार पेठ, राजारामपुरी, कोल्हापूर रेल्वे स्टेशन, शिवाजी विद्यापीठ, मंगळवार पेठ, गडहिंग्लज, गारगोटी, वडगाव.नव्याने कार्यरत होणारी १८ कार्यालयेबिद्री, चंदगड, आजरा, कोल्हापूर शहर प्रधान डाकघर, गांधीनगर, भेंडे गल्ली, कुरुंदवाड, गडहिंग्लज-टिळक पथ, उद्योगनगर-इचलकरंजी, साने गुरुजी वसाहत, आर. के.नगर कोल्हापूर, बाबूजमाल, प्रतिभानगर, कसबा बावडा, रंकाळा, रुकडी, फुलेवाडी, आंबेवाडी.