कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी प्राध्यापकांचे राज्यभर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू आहे. या आंदोलनादरम्यानच कोल्हापूर विभागातील २७३८ प्राध्यापकांचा पगार लांबला आहे. याबाबत विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून स्पष्ट माहिती मिळत नसल्याने प्राध्यापकांतून नाराजी व्यक्त होत आहे.महाराष्ट्र फेडरेशन आॅफ युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स आॅर्गनायझेशन्स (एम्फुक्टो) आणि शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाच्या (सुटा) नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील प्राध्यापकांनी गेल्या १३ दिवसांपूर्वी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
राज्यभर हे आंदोलन सुरू आहे. पुणे, अमरावती, जळगाव, औरंगाबाद विभागांतील प्राध्यापकांचा पगार झाला आहे. मात्र, या महिन्यातील सात तारीख उलटून गेली, तरी कोल्हापूर विभागामधील २७३८ प्राध्यापकांचा पगार अजून झालेला नाही. याबाबत ‘सुटा’च्या काही पदाधिकाऱ्यांनी शिक्षण सहसंचालक कार्यालयात विचारणा केली असता, त्यांना पगार का करण्यात आलेला नाही. याचे कारण अथवा स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही.
शासन नियमानुसार दर महिन्याच्या एक तारखेला पगार होणे आवश्यक आहे. दोन-तीन दिवस पगार लांबणे ठीक आहे. मात्र, आठ तारीख झाली, तरी कोल्हापूर विभागातील प्राध्यापकांचा पगार झालेला नाही. आंदोलन सुरू असताना अन्य विभागांतील प्राध्यापकांचे पगार झाले आहेत. मात्र, कोल्हापूर विभागातील पगार लांबला हे दुर्दैवी आहे. ‘सुटा’तर्फे विचारणा केली असता, शिक्षण सहसंचालक स्पष्ट कारण सांगत नाहीत.-डॉ. आर. जी. कोरबू, कार्यकारिणी सदस्य, सुटा.
या बेमुदत कामबंद आंदोलनात सहभागी प्राध्यापकांच्या ‘नो वर्क-नो पे’ याबाबतच्या कार्यवाहीच्या अनुषंगाने वरिष्ठ कार्यालयाकडून मार्गदर्शन आणि माहिती मागविली आहे. अद्याप संबंधित माहिती, मार्गदर्शन मिळालेले नाही. आंदोलनातील सहभागी आणि जे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आंदोलनात सहभागी नाहीत त्यांचा पगार लांबला असल्याचे वास्तव आहे. याबाबत आज निर्णय घेण्यात येईल.- डॉ. अजय साळी,सहसंचालक, उच्च शिक्षण कोल्हापूर विभाग.
कोल्हापूर विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात
- अनुदानित महाविद्यालये : १३३
- आंदोलनातील सहभागी प्राध्यापक : १७३८
- आंदोलनात नसलेले प्राध्यापक : १०००