शिरोली : मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महामार्ग रोखला नाही. यावेळी आंदोलक व पोलीसांत झटापट झाली. आक्रमक झालेल्या आंदोलकांनी राज्य सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली.मराठा आरक्षणाच्या कायद्याला सुप्रीम कोर्टान अंतरिम स्थगिती दिली आहे. यामुळे मराठा समाज अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे सकल मराठा समाजाने आज महामार्ग रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.
कार्यकर्ते तावडे हॉटेल येथे जमा होत होते; मात्र आज नीटची परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये यासाठी बारा पर्यंत आंदोलक थांबून होते. यानंतर आरक्षण आमच्या हक्काचे, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, जय भवानी - जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, हर हर महादेवच्या घोषणा देत आंदोलक महामार्गाकडे गेले.
आंदोलक महामार्गावर येताच, पोलीसांनी त्यांना ताब्यात घेण्यास सुरवात केली. यामुळे आंदोलक व पोलीसांच्यात झटापट झाली. पोलीसांनी सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. आजवर आम्ही शांतपणे आंदोलने केली मात्र आता आरक्षणासाठी मराठ्यांचा हिसका दाखवावा लागेल.
आरक्षण मिळाले नाही, तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे, अन्यथा पुणे, मुंबईची दुध वाहतूक रोखण्याचा इशारा सचिन तोडकर यांनी दिला.
या आंदोलनात दिलीप पाटील, स्वप्नील पार्टे, सचिन तोडकर, रविंद्र मुतगी, राजेंद्र चव्हाण, उदय प्रभावळे, योगेश खाडे, आभिषेक सावंत, सचिन कांबळे, समरजीत तोडकर, मन्सुर नदाफ, नितीन देसाई, सुनिल चव्हाण, योगेश भोसले, ईश्वर पाटील, सम्राट शिर्के, महेश अनावकर, अनिकेत मुतगी,गणेश खोचीकर, विशाल खोचीकर आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.सकल मराठा समाजाचे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोणताही अनुचित प्रकार होणार नाही, याची दक्षता घेत पोलीस प्रशासनाने मोठा फौजफाटा तैनात केला होता.
आंदोलकांपेक्षा पोलीसांची संख्या जादा असल्याचे चित्र आंदोलन स्थळी पहायला मिळाले. पोलीस उपअधिक्षक प्रशांत अमृतकर,प्रेरणा कट्टे, पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले, सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात होता.