पोपट पवार
कोल्हापूर : कोल्हापुरातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या २४ वर्षांपासून पदनिर्मितीच केली नसल्याने या महाविद्यालयात वर्ग एक ते वर्ग चारपर्यंतची तब्बल २९२ पदे अद्यापही रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाऱ्यांवर मोठा ताण पडत आहे. शिवाय, वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यालाही मर्यादा येत आहेत. एकीकडे कोट्यवधी रुपयांचा निधी देऊन जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम केल्याचा दावा करणाऱ्या वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांच्या जिल्ह्यातीलच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन तपापासून पदनिर्मितीच केली जात नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या महाविद्यालयाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला दोनवेळा पदनिर्मितीचा प्रस्तावही पाठवला आहे.तत्कालीन आरोग्यमंत्री स्व. दिग्विजय खानविलकर यांनी कोल्हापुरात २००० साली राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून आणले. येथे सुरुवातीला एमबीबीएस हा एकच अभ्यासक्रम होता. मात्र, कालांतराने या महाविद्यालयाने पदव्युत्तर अभ्यासक्रमही सुरू केला. पुढे, डीएमएलटी, बीएमएलटी हे अभ्यासक्रमही सुरू केले. या महाविद्यालयात अभ्यासक्रमांची संख्या वाढली, परिणामी विद्यार्थीही वाढले, मात्र, प्राध्यापक, सहयोगी, सहायक प्राध्यापक यासह तांत्रिक-अतांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या आहे तितकीच राहिल्याने सध्याच्या कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने २९२ पदनिर्मितीचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे नुकताच पाठवला आहे. यापूर्वी तो २०२२ मध्ये पाठवला होता. मात्र, त्यावर कोणतीच कार्यवाही केली नव्हती.कर्मचाऱ्यांवरील ताण कधी हटणार?विद्यार्थी संख्या जास्त असल्याने प्राध्यापकांवरील ताण वाढला आहे. शिवाय, विभागांची संख्या जास्त व कर्मचाऱ्यांची संख्या कमी असे चित्र असल्याने एका कर्मचाऱ्याकडे दोन-दोन विभाग देण्यात आले आहेत. गेल्या २४ वर्षांपासून हेच चित्र असल्याने वर्ग तीन, चारचे कर्मचारी वैतागले आहेत.
आवश्यक पदे - कार्यरत पदे - मागणीचा प्रस्ताववर्ग १ व २: १६९ - १४७ - २२वर्ग ३ : ३१९ - ११४ - २०५वर्ग ४ : ९२ - २८ - ६४कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम कधी करणार?एकीकडे राज्य सरकारने एनआरएलएममधील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेतले आहे. मात्र, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न जैसे थे आहे. कोल्हापुरातील वैद्यकीय महाविद्यालयात तब्बल ६४ कंत्राटी कर्मचारी आहेत. हे गेल्या दहा ते पंधरा वर्षांपासून कार्यरत आहेत. मात्र, तरीही त्यांना अद्याप कायम केले नसल्याने त्यांच्यात नाराजी आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी मनावर घेण्याची गरजपालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण मंत्रिपद आल्यापासून त्यांनी जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी बाराशे कोटी रुपयांचा निधी एकाच वर्षात दिला आहे. यामध्ये शेंडा पार्कातील अद्ययावत रुग्णालयाचाही समावेश आहे.कोल्हापुरातील महत्त्वाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील पदनिर्मितीचा प्रश्नही ते मनावर आणले तर सोडवू शकतात. त्यामुळे मंत्री मुश्रीफ यांनीच या महाविद्यालयात पदनिर्मिती करून आरोग्य व्यवस्थेला बळकटी आणावी, अशी मागणी होत आहे.