कोल्हापूर म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि निसर्गाची देणगी लाभलेले समृद्ध शहर. ‘युनेस्को’च्या नियमांनुसार जागतिक वारसा लाभलेले शहर होण्याची क्षमता असलेल्या कोल्हापुरात अद्यापही प्राचीन वास्तूच्या जतन-संवर्धनाबद्दल जागरूकता नाही. नागरिकांनी थोडा पुढाकार घेतला तर या वास्तुकला आणि संस्कृती पाहायला जगभरातून पर्यटक येतील, असा विश्वास जिल्हा व शहर हेरिटेज कमिटीच्या अध्यक्षा अमरजा निंबाळकर यांना आहे. परंतु, हे का घडत नाही याबाबत ‘लोकमत’शी साधलेला थेट संवाद...प्रश्न : ‘वारसा’ या संकल्पनेत कोणकोणत्या गोष्टींचा अंतर्भाव होतो?उत्तर : ज्या शहराला आणि तेथील वास्तूंना धार्मिक, ऐतिहासिक, प्राचीन महत्त्व आहे, वास्तुशास्त्राच्या दृष्टीने असलेले वेगळेपण, एखाद्या कालखंडाची अथवा संस्कृतीची छाप असलेली वास्तू, नैसर्गिकरीत्या असलेली समृद्धता, नद्या, डोंगर, पठार, शहराला लाभलेली संस्कृती, खेळ, सण, वैशिष्ट्यपूर्ण वस्तू, खाद्यपदार्थ अशा सगळ्या गोष्टींचा वारशात अंतर्भाव होतो. जागतिक पातळीवर युनेस्को, राष्ट्रीय पातळीवर एएसआय आणि राज्य पातळीवर पुरातत्त्व खाते, जिल्हा पातळीवरील हेरिटेज कमिटी अशा रीतीने पुरातत्त्व खात्याचे काम चालते. एखादे शहर किंवा वास्तूचा वारसा यादीत समावेश होऊ शकेल की नाही, याचा निर्णय वास्तूचे महत्त्व आणि त्यामागील इतिहास या वैशिष्ट्यांवरच ठरतो.
प्रश्न : जागतिक वारसास्थळांच्या निकषांत कोल्हापूरचे काय स्थान आहे?उत्तर : ‘युनेस्को’च्या नियमांच्या निकषांनुसार जागतिक वारसा शहर होण्याची सर्व वैशिष्ट्ये कोल्हापूरला लाभली आहेत. धार्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, नैसर्गिक दृष्टीने मिळालेली देणगी म्हणून कोल्हापूरचे विशेष महत्त्व आहे. आज देशाच्या नकाशावर जयपूर, जोधपूर, लखनौ, अहमदाबाद यासारख्या शहरांना ‘जागतिक वारसा लाभलेली शहरे’ म्हणून मान्यता मिळत असताना, त्याच दर्जाची वैशिष्ट्ये लाभलेली असतानाही, कोल्हापूरचा त्या शहरांच्या यादीमध्ये समावेश नाही, हे दुर्दैवच आहे. महाराष्ट्रातील ‘ग्रेड ए’ मधील २१ वारसास्थळांमध्ये खिद्रापूरसारखे राष्ट्रीय स्मारक, दाजीपूर अभयारण्य, पन्हाळा यासारखी पाच वारसास्थळे तर कोल्हापुरातीलच आहेत. अजूनही अनेक वास्तू व किल्ल्यांचा त्यात समावेश होऊ शकतो. गरज आहे ती मानसिकतेची आणि शासकीय यंत्रणेच्या आस्थेची.
प्रश्न : कोल्हापुरातील वारसास्थळांचे संवर्धन व जनजागृती होण्यासाठी हेरिटेज समिती काय काम करते?उत्तर : जिल्हा व शहर हेरिटेज समिती एक वर्षापूर्वी स्थापन झाली. तेव्हापासून समितीच्या वतीने कोल्हापूर शहर, जिल्ह्यातील प्राचीन वास्तूंची यादी बनविण्याचे काम सुरू आहे. वारसास्थळांकडे संवेदनशीलतेने बघणारी पिढी घडावी यासाठी गेल्या आठवड्यात वारसा सप्ताहाच्या निमित्ताने सर्व शालेय विद्यार्थ्यांना वारसा स्थळांवर नेऊन त्यांची माहिती देण्यात आली. त्यांचे महत्त्व आणि नागरिक म्हणून आपली असलेली जबाबदारी विशद करण्यात आली. एखादी व्यक्ती हेरिटेज नियमांचे पालन करीत नसेल तर तशा सूचना केल्या जातात. नाहीच ऐकले तर नोटीस काढली जाते. शासकीय यंत्रणांना मार्गदर्शक म्हणून हेरिटेज कमिटी काम करते. कार्यशाळा, चर्चासत्र या माध्यमांतूनही स्थानिक प्रशासनाला माहिती देऊन त्यांचे प्रबोधन केले जाते.
प्रश्न : वारसास्थळांचा उपयोग पर्यटनवृद्धीसाठी कसा उपयोग करून घेता येईल?उत्तर : एखादी वास्तू किंवा परिसराचा वारसास्थळांच्या यादीत समावेश झाला की आपसूकच त्याचे महत्त्व वाढलेले असते. वास्तू जतन करण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. त्या निधीतून वास्तूचे संवर्धन केले गेले पाहिजे. त्या परिसराची स्वच्छता, माहिती देणारे फलक आणि पर्यटकांना तिथे पोहोचण्यासाठी दळणवळणाची, रस्त्यासारख्या मूलभूत गोष्टींची सोय एवढे झाले तरी खूप आहे. सध्या सोशल मीडिया सर्वांत पुढे असल्याने त्याद्वारे वास्तूंची माहिती जगभर पोहोचविता येते. पर्यटकांना सोईसुविधा मिळाल्या की त्यातून पर्यटनवृद्धी व्हायला वेळ लागत नाही.
प्रश्न : ‘पुरातत्त्व’चे निकष, हरकती यांमुळे वास्तूंचा वारसास्थळात समावेश होण्यास बराच कालावधी लागतो. तेवढ्यात वास्तूचे अतोनात नुकसान झालेले असते. हे चित्र बदलण्यासाठी काय करता येईल?उत्तर : ही बाब अत्यंत खरी आहे की, वास्तूच्या वारसास्थळावर अंतिम शिक्कामोर्तब व्हायला वेळ लागतो. परिणामी वास्तूसह परिसरच नामशेष होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रह्मपुरी. हे टाळण्यासाठी सूक्ष्म पातळीवर नियोजन असून, ही प्रक्रिया व नियमावली सोपी व सुटसुटीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, एकदा नागरिकांना वास्तूबद्दलची माहिती मिळाली की त्यांनी स्वत:हूनच त्याची काळजी घेणे ही पहिली जबाबदारी आहे. तरीही एखादी व्यक्ती जाणीवपूर्वक वास्तूचे नुकसान करीत असेल तर अजामीनपात्र गुन्हा व दंडात्मक शिक्षेची तरतूद आहे. दुसरीकडे, गाव ते शहर पातळीवरील शासकीय यंत्रणांची भूमिका यात खूप महत्त्वाची आहे. त्यांनी आस्थेने काही ठोस पावले उचलली पाहिजेत.- इंदुमती गणेश