कोल्हापूर : राज्यात अतिरिक्त दुधाचा प्रश्न गंभीर होत असून, बटर व पावडरमुळे दूध संघ अडचणीत आले आहेत. यासाठी राज्य व केंद्र सरकारने बटर व पावडर खरेदी करून विक्री करावी, यासाठी आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी गोकुळच्या शिष्टमंडळाला दिली.गोकुळचे नूतन अध्यक्ष विश्वास पाटील व संचालकांनी बुधवारी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी पवार यांनी आपण मुख्यमंत्री असताना गोकुळला ताराबाई पार्क येथील दिलेली शासकीय जागा, मुंबईतील दूध विक्रीस परवानगी आदी आठवणींना उजाळा दिला.
गोकुळने कोल्हापूर जिल्ह्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी राबवलेल्या विविध योजना, त्यातून पारंपरिक दूध व्यवसायात निर्माण झालेली व्यावसायिकता याबद्दल कौतुक केले. कोल्हापूर जिल्ह्याची ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करण्याचे गोकुळने केल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, ह्यगोकुळह्णचे अध्यक्ष विश्वास पाटील, ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, मुंबई शाखा प्रमुख दयानंद पाटील उपस्थित होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, दुग्धविकास मंत्री सुनील केदार, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांचीही सदिच्छा भेट घेतली.