माणगाव : ग्रामपंचायतीच्या १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीमध्ये माणगाव ग्रामविकास आघाडीचे १३ उमेदवार निवडून येत आवाडे गटाची सत्ता अबाधित ठेवण्यात यश आले आहे. त्याचवेळी विरोधी महाविकास आघाडीने कडवी झुंज देत चार उमेदवार निवडून आल्याने सत्तारूढ गटात अस्वस्थता वाढली आहे.
माणगाव हे स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाचे प्राबल्य असलेले गाव जरी समजले जात असले तरी यंदा स्वाभिमानीमध्ये फूट पडल्याने मूळ स्वभिमानी कोण, असे वातावरण झाल्याने याचा काहीसा फटका महाविकास आघाडीला बसला आहे. जिल्ह्यात स्मार्ट ग्राममध्ये प्रथम क्रमांक घेतलेल्या गावाची निवडणूक बिनविरोध होईल, अशी अटकळ होती; पण जागा वाटपात समाधान न झाल्याने निवडणूक झाली.
सत्तारूढ गटाने विकासाचा मुद्दा उचलत, तर विरोधी गटांनी सत्तारूढ गटाच्या झालेल्या चुका शोधत निवडणुकीत रंगत आणली होती.
चुरशीने झालेल्या निवडणुकीमध्ये ग्रामविकास आघाडीचे माजी उपसरपंच राजू मगदूम, जि.प. सदस्या वंदना मगदूम, माजी सरपंच अनिल पाटील, माजी सरपंच जिनगोंडा पाटील, नंदकुमार शिंगे, आय. वाय. मुल्ला यांनी, तर महाविकास आघाडीचे नेतृत्व झाकीर भालदार, अरुण मगदूम, दिलीप महाजन, नितीन कांबळे, लक्ष्मण कोळी, सुभाष मगदूम यांनी केले.
तथापि सुरुवातीस एकतर्फी वाटणारी ही निवडणूक अटीतटीची होत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्तारूढ गटास जेरीस आणल्याचे चित्र होते. सत्तारूढ गटाचे माजी उपसरपंच राजू जगदाळे व महाविकास आघाडीचे झाकीर भालदार व माजी उपसभापती अरुण मगदूम यांचा पराभव दोन्ही गटास धक्कादायक झाला असून, महाविकास आघाडीचे तीन उमेदवारांचा अल्पमतात झालेला पराभव जिव्हारी लागला आहे.