लोकमत न्यूज नेटवर्क
खोची : विद्युत मोटारींच्या केबल चोरीच्या प्रकारास पुन्हा सुरुवात झाली आहे. वारणा नदी काठचा शेतकरी या प्रकाराने हैराण झाला आहे. पुन्हा आपले डोके वर काढीत चोरट्यांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे. या चोरट्यांचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान व मनस्ताप पोलिसांनी थांबवावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
खोची येथील येथील वारणा नदीकाठी गेल्या चार-पाच दिवसांत चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालून सुमारे दोन लाखांच्या केबल लंपास केल्या आहेत. ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीसच हे प्रकार झाल्याने पिकांना वेळेत पाणी देणे मुश्किल होऊन बसले आहे. निष्कारण पाण्याअभावी पिके वाळण्यास सुरवात झाली आहे.शेतकरी या प्रकाराने वैतागून गेला आहे.
शेवाळे टेक ते दुधगाव गोंड परिसरात चोरीचे प्रमाण वाढले आहे. रात्री विद्युत पुरवठा नसतो त्यावेळी नदीकाठच्या शेतीवर शेतकरी नसतात. तसेच विद्युत पुरवठ्याचा धोका नसतो. हे साधून चोरट्यांनी चोरीची मोहीम फत्ते करण्याचा सपाटा लावला आहे. केबलमधील तांब्याची तार महागडी असते. केबलचे आवरण काढून त्यातील तार लंपास केली जात आहे. इतरत्र किंवा लांब अंतरावर केबलचे आवरण काढून टाकले असल्याचे दिसून येते.
या भागात वारणा नदीवरून शेतीला पाणीपुरवठा करणाऱ्या योजना बहुतांश शेतकऱ्यांनी स्वतःच्या नेल्या आहे. तसेच सहकारी संस्थांच्या सुद्धा मोठ्या योजना आहे. भेंडवडे, लाटवडे, बुवाचे वाठार परिसरातही पाणीपुरवठा करणाऱ्या संस्था जास्त आहेत. या योजनेमुळेच येथील ऊसशेती अधिक आहे. भाजीपाला, फळपिके असणारी शेती ही वाढत आहे. आता तर उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. त्यामुळे पाण्याचे करेक्ट नियोजन शेतकरी करतो. पण केबल चोरीमुळे साहजिकच पाणीपुरवठा खंडित होतो. पिके वाळतात. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. नेमका तोच प्रकार आता दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यातच दहा ते पंधरा शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. दोन शेतकऱ्यांची सलग दोन दिवसांत दोनवेळा केबल चोरी झाली आहे. चोरी झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी नवीन केबल घातली. ती सुद्धा त्याच रात्री चोरीला गेली.
प्रकाराने परिसरात चिंता निर्माण झाली आहे.
या चोरट्यांनी प्रतिवर्षाप्रमाणे पोलिसांच्या समोर पुन्हा आव्हान निर्माण केले आहे. वडगाव पोलिसांनी यंत्रणा गतिमान करून या चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.