एकनाथ पाटील --कोल्हापूर --जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, बसस्टॉप, आदी परिसरांत असभ्य वर्तनाबरोबरच तरुणींची छेड काढणाऱ्या ८६७ तरुणांना ‘निर्भया’ पथकाने ‘खाकीचा प्रसाद’ दिला आहे. एका महिन्याभरातील पथकाच्या या कारवाईचा जिल्ह्यात चांगलाच दबदबा निर्माण झाला आहे. युवती व महिलांना ‘निर्भया’ पथक सुरक्षेचा आधारवड ठरत आहे. या पाच जिल्ह्यांतील कारवाईचा आढावा आज, रविवारी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयात घेणार आहेत. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी परिक्षेत्रातील पाच जिल्ह्यांतील १४६ पोलिस ठाण्यांमध्ये तरुणी व महिलांच्या सुरक्षेसाठी ‘निर्भया’ पथकाची स्थापना केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात ८ आॅगस्टला ‘निर्भया’ पथकाचा प्रारंभ करण्यात आला. जिल्ह्यामध्ये सध्या दहा पथके कार्यरत आहेत. त्यांमध्ये एक अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या पथकांना स्वतंत्र ड्रेस कोड व दिमतीला वेगवान दुचाकी देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यामध्ये त्यांनी तरुणी व महिलांची छेड काढणाऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. ‘निर्भया’ पथकाने महिन्याभरात जिल्ह्यात विविध ठिकाणी तरुणींची छेड काढणे, शेरेबाजी करणे, रस्ता अडविणे, पाठलाग करणे, हातवारे करणे अशी दुष्कृत्ये करणाऱ्या ८५७ तरुणांना ‘खाकी’चा प्रसाद देत कारवाई केली आहे. पथकाने २९६ ठिकाणी प्रबोधन कार्यक्रम घेतले आहेत. ३९० जणांना समुपदेशन केले आहे. अतिशय थंड डोक्याने आणि हुशारीने पथके कारवाई करीत आहे. त्यांच्या कारवाईची चाहूल कोणालाच लागत नाही. छेडछाड करीत असल्याचे व्हिडिओ शूटिंग करून त्याला रंगेहात पकडले जाते. पथकाच्या सर्व्हेनुसार ग्रामीण भागात शाळा-महाविद्यालयीन तरुणींची बसस्टॉप, एस. टी. बस, कॉलेज कॅम्पस, आदी ठिकाणी छेडछाड होत असल्याचे निदर्शनास आले आहे.कोल्हापूर शहर व जिल्ह्यात ‘निर्भया’ पथके नेहमी सतर्क असतात. महिन्याभरात ८५७ तरुणांवर कारवाई केली आहे. युवती व महिलांसाठी भयमुक्त वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. -आरती नांद्रेकर, ‘निर्भया’ पथक प्रमुख
‘निर्भया’चा दबदबा; ८६७ तरुणांना दणका
By admin | Published: September 18, 2016 12:57 AM